आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील मिळाले, पण आई बेपत्ता, मातेनेच सोडले होते गायरानात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - शनिवारी उरूस मैदान परिसरातील गायरानात सापडलेल्या तान्हुल्याला पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांकडे सुपूर्द केले. दोन दिवसांपासून रडत असलेल्या बाळाचे रडणे थांबले आहे. तान्हुल्याला त्याच्या आईनेच गायरानात सोडल्याचे स्पष्ट झाले असून आई बेपत्ता असल्याची तक्रार तान्हुल्याच्या वडिलांनी खुलताबाद पोलिसांत केली आहे.

तान्हुल्याचे वडील अंकुश विश्वनाथ सोटम हे वानेगाव, ता. फुलंब्री येथील रहिवासी आहेत. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. ते पत्नी सरलाबाईसह वानेगाव येथे राहत होते. घरातील कामे अाटोपून पती कामावर गेल्यावर सरलाबाईने तान्हुल्याला उपचारासाठी खुलताबादला नेत असल्याचा बहाणा केला. सायंकाळ झाली तरी सरलाबाई घरी परतली नाही. त्यामुळे अंकुश यांनी फुलंब्री येथे पत्नीचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत दोघेही सापडले नाहीत.

दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी वर्तमानपत्रात तान्हुल्याचे वृत्त पाहून त्यांनी खुलताबाद पोलिस ठाणे गाठले व पोलिसांनी तान्हुल्याला वडिलांच्या स्वाधीन केले; परंतु पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी या वेळी ठाण्यात नोंदवली. सरलाबाईचा शोध लागल्यावरच सत्य काय ते समोर येईल. याप्रकरणी अधिक तपास खुलताबाद पोलिस करत आहे.