आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, दोन चिमुकल्यांची हत्या करून पित्याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पत्नीचे दुस-याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वेल्डिंगचे काम करत लोखंड जोडणा-या कारागिराने स्वत:चा संसार मात्र मोडला. तो एवढ्यावरच थांबला नाही. सोमवारी पहाटे त्याने काळालाही कापरे भरावे असे क्रौर्य दाखवत पोटच्या दोन पोरांचा जीव घेऊन स्वत: आत्महत्या केली. काळजाचे पाणी पाणी करणारी ही घटना चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत घडली. राम मारुती आहिर (४५) असे या क्रूरकर्मा पित्याचे नाव असून त्याने अंशुमन (५) आणि वीर (८) या दोघा पोटच्या गोळ्यांचा गळा घोटला. दरम्यान, या हत्याकांडातून रामची दहा वर्षांची मुलगी वाचली. रविवारी रात्री रामने पत्नीकडे तिघांना घरी मुक्कामासाठी पाठवण्याचा आग्रह धरला होता. मात्र, मुलीने आईकडेच थांबण्याचा हट्ट धरल्याने ती बचावली.

चिकलठाणा रोडवरील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाखाली सकाळी साडेसातच्या सुमारास एक बेशुद्ध व्यक्ती पडून असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्याच्या गळ्यात प्लास्टिकची दोरी आणि दोन्ही हातांच्या मनगटाच्या नसा ब्लेडने कापलेल्या दिसल्या. बघता बघता तेथे गर्दी जमून ही वार्ता वाऱ्यासारखी चौधरी कॉलनीत पसरली. साडेआठच्या सुमारास एमआयडीसी सिडको पोलिस घटनास्थळी पोहोचले. चौकशीअंती ती व्यक्ती चौधरी कॉलनीतील राम आहिर असून तो वेल्डिंगची कामे करीत असल्याचे कळले. त्याला घाटीत हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहआयुक्त सुखदेव चौघुले, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक गोरख चव्हाण, तडवी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस रणवीरकर करीत आहेत.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय
वेल्डिंगच्या कामावर रामची जेमतेम कमाई होत होती. चौधरी कॉलनीत दहा बाय दहाची खोली त्याने किरायाने घेतली होती. तो नेहमीच दारू पीत असल्यामुळे ज्योतीशी कायम भांडण होत असे. शिवाय राम ितच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून ती मुलांसह चौधरी कॉलनीतच आईकडे राहत होती.

मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी
रामने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नीचे चारित्र्य चांगले नसल्याचा उल्लेख केला. मुलाबाळांना ती सांभाळणार नसून नातेवाइकांना द्या, असे चिठ्ठीत म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. रामच्या पश्चात पाचोडला पाच भाऊ, सहा बहिणी आहेत. तेथेच त्याची दुसरी पत्नी असल्याची चर्चाही होती.

आईच्या कुशीत रूपीला जीवदान
चार महिन्यांपूर्वी राम आणि त्याची पत्नी ज्योती यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे ज्योती दोन मुले आणि मुलीला घेऊन आईकडे राहण्यासाठी गेली होती. काही दिवसांनंतर पती-पत्नीत बोलाचाली होऊ लागली. मात्र, ज्योती माहेरीच राहत होती. रामच्या आग्रहावरून कधी-कधी मुले आणि मुलगी त्याच्याकडे रात्री मुक्कामाला जात होते. घरात आजी (रामची आई) असल्यामुळे ती मुलांना रामसोबत जाऊ द्यायची. रविवारी रात्री त्याने तिघांना घरी नेण्याचा आग्रह धरला. मात्र, रूपीने आईकडेच थांबण्याचा आग्रह धरला. त्यामुळे ती बचावली. घटनेच्या एक दिवस अगोदरच रामने आई कमलाबाई हिला पाचोडला नेऊन सोडल्याचे कळते.

पोलिसांनी रामचा पुतण्या कृष्णा याला सोबत घेऊन रामचे घर गाठले. त्याच्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा समोरील दृश्य पोलिसांसह सर्वांचेच मन सुन्न करणारे होते. घरात वीर आणि अंशुमन यांचे मृतदेह पडलेले होते. उशीने तोंड दाबून त्यांची हत्या करण्यात आली होती. घरापासून काही अंतरावरच माहेरी राहणारी रामची पत्नी ज्योती आणि तिची आई तेथे पोहोचली. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या दोन मुलांशिवाय त्याला चार मुली आहेत. या दांपत्याला एकूण सहा अपत्यांपैकी राणी आणि मोनी या दोन मोठ्या मुलींची लग्ने झाली आहेत, तर रूपीसह दोघे भाऊ आईकडे राहत होते. एक लहान मुलगी महानुभाव आश्रमात राहते.