आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन दिवाळीत ‘महावितरण’ चा ग्राहकांना चुकीच्या बिलांचा शॉक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - सर्वत्र दिवाळी सणानिमित्ताने बालगोपाळांसाठी खरेदी सुरू असतानाच ऐन सणासुदीच्या दिवसांत ‘महावितरण’ने ग्राहकांना चुकीच्या बिलांचा शॉक दिला आहे. पंढरपूर वाळूज महानगरात ग्राहकांना सर्रास चुकीची बिले देण्यात आली आहेत, तर महिन्याकाठी केवळ ५० युनिट विजेचा वापर असणाऱ्या पंढरपुरातील ग्राहकाच्या देयकावर दुसऱ्या ग्राहकाच्या मीटरचा फोटो छापून तब्बल ३३ हजार ४१० रुपयांचे चुकीचे बिल देण्यात आले आहे. या ‘महावितरण’च्या सावळ्या गोंधळाची चौकशी करून ग्राहकांना सणासुदीच्या दिवसांत नाहक मानसिक त्रास देणाऱ्या दोषी असणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या वतीने (महावितरण) वाळूज महानगरात वीजपुरवठा करण्यात येतो. परिसरात महावितरणचे तब्बल हजार १८४ घरगुती, तर एक हजार ४७० व्यावसायिक ग्राहक आहेत. त्यात पंढरपूर, वाळूज एमआयडीसी, वडगाव कोल्हाटी बजाजनगर ही पाऊण लाख कामगारांची वसाहत परिसर येतो. दिवाळी सण आठवड्यावर अाल्यामुळे रहिवासी घरांना रंग देणे, किराणा सामान भरणे, बालगोपाळांच्या कपड्यांची खरेदी करण्याच्या कामात गुंतले आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे.

महावितरणने आणले आनंदात विघ्न
दिवाळी सणामुळे उत्साहाचे वातावरण असतानाच महावितरणने ग्राहकांना चुकीच्या बिलांचा शॉक दिला आहे. अनेक ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा चुकीची बिले दिली आहेत. येथील महादेवसिंग ठाकूर या ग्राहकाचा क्र.४९००१०९८२१६० आहे. त्यांनी यापूर्वीचे ऑगस्ट महिन्याचे बिल १९ सप्टेंबर २०१६ रोजी भरले. त्यानंतर त्यांना २० ऑक्टोबर २०१६ रोजी सप्टेंबर महिन्यात वापरलेल्या विजेचे बिल तब्बल ३३ हजार ४१० रुपये आले. जेव्हा बिल त्यांच्या हाती पडले तेव्हा त्यावरील आकडे बघून त्यांना तर भोवळच आली. शुभम ट्रेडर्सचे मालक पारस कटारिया यांनी त्यांना खाली बसवून पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर आलेले विजेचे बिल बारकाईने बघितले असता बिलावरील मीटरचा फोटो मात्र दुसऱ्याच ग्राहकाचा(ग्राहक क्र.४९००११८८७४४६)दिसून आला. तेव्हा खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ग्राहकांना अशी चुकीची धक्कादायक वीजबिले मिळत असल्यामुळे ग्राहकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून दोषींविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
चुकीच्या देयकांची स्पॉटवरच दुरुस्ती करणार
वीज वापराच्या बिलांची नोंद खासगी एजन्सी घेत असते. दोन महिन्यांपूर्वी हे काम साई-शाम या एजन्सीकडे देण्यात आलेले आहे. ही एजन्सी मीटर रीडिंग घेऊन महावितरणकडे देते. त्याप्रमाणे ग्राहकांना वीज बिले दिली जातात. अनवधानाने त्यात काही तांत्रिक चुकांमुळे ग्राहकांना चुकीची बिले दिली जातात. त्यासाठी ग्राहकांनी ही बिले आणून तक्रार अर्ज करावेत जेणेकरून अशा चुकीच्या देयकांची स्पॉटवर पाहणी करून लगेच दुरुस्ती करून दिली जाईल. -राकेश पवार, अभियंता महावितरण, वाळूज एमआयडीसी कार्यालय (बिलिंग विभाग)
बातम्या आणखी आहेत...