आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूच्या धाकावर चार लाखांची बॅग पळवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- "सलामती चाहता है तो पैसे निकाल' असे म्हणत एका एजन्सीच्या वसुली कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडे जमा चार लाख रुपये लुटण्यात आले. सिडको एन परिसरात छत्रपती शिवाजी महाविद्यालयासमोर शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली.
संतोष घोडके (४३) असे लुटल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे कुठलीही घटना घडल्यानंतर तीन मिनिटांत पोहोचू असा दावा करणारे पोलिस घटनेची माहिती िदल्यानंतर तासाभरातही घटनास्थळी पोहोचू शकले नाही.
संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास संतोष घोडके आपल्या दुचाकीवर पैशाची बॅग घेऊन मोंढ्यातून छत्रपती महाविद्यालयामार्गे एन परिसरात जात होते. त्यांची दुचाकी महाविद्यालयासमोरील अंधार असलेल्या भागात येताच त्यांचा पाठलाग करीत आलेल्या दोन तरुणांनी अगदी फिल्मी स्टाइलने त्यांची दुचाकी घोडके यांच्या दुचाकीसमोर लावून त्यांचा रस्ता अडवला. दोघांनीही तोंडाला रुमाल बांधला होता. त्यांची दुचाकी विनानंबरची होती. घोडके यांनी दुचाकी थांबवताच एकाने खिशातून रामपुरी चाकू काढून संतोष यांच्या पोटाला लावला.
"सलामती चाहता है तो पैसे निकाल' अशा शब्दांत त्यांना धमकावत त्यांच्या पाठीवरील पैशाची बॅग हिसकावून घेऊन जालना रोडकडे पसार झाले. घाबरलेल्या घोडके यांनी नंतर "चोर चोर' अशी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत लुटारू पसार झाले. ते पसार होत असताना रामगिरी चौकात वाहतूक पोलिसही हजर नव्हता.

एवढे पैसे आले कसे?
घोडकेहे गौरी एन्टरप्रायजेसमध्ये नोकरीला आहेत. या एन्टरप्रायजेसचे मालक दीपक मुंदडा आणि अमित मुंदडा असून हिंदुस्थान लिव्हर आणि नेसले कंपनीच्या उत्पादनांची एजन्सी ते चालवतात. घोडके हे गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्याकडे रिकव्हरीचे (वसुली) काम करतात. घोडके त्यांच्याकडील पैसे मुंदडा यांच्या एन-३ येथील घरी देण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.

... तर चोरटे सापडले असते
घोडकेयांनी आपल्या मोबाइलवरून तत्काळ १०० क्रमांक डायल करून पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. तेव्हा तुम्ही घटनास्थळीच थांबा, आमचे कर्मचारी काही मिनिटांत तेथे येतील, असा निरोप त्यांना मिळाला. मात्र अर्धा तास उलटूनही कोणीही घटनास्थळी आले नाही. घोडके यांनी एजन्सी मालक मुंदडा यांनाही घटनेची माहिती दिली होती. ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही मुकुंदवाडी पोलिसांना चार ते पाच वेळा फोन लावला. मात्र कोणीही आले नाही. अखेर एक तासानंतर पोलिस निरीक्षक नाथा जाधव घटनास्थळी आले. चार्ली, गुन्हे शाखेचे पथक, किंवा गस्त घालणारे कर्मचारी असे कोणीही आले नाही. या घटनेनंतर नाकेबंदी केली असती तर चोरटे सापडण्याची शक्यता होती.
७:१५
७:१४
७:१३
७.१२
घोडकेकडून पैशांची बॅग हिसकावून लुटारू पसार झाले.
एकाने त्यांच्या पोटाला चाकू लावला तर दुसऱ्याने बॅग हिसकावली.
दोघे चोरटे दुचाकीवरून आले, घोडकेंची दुचाकी अडवली.
घोडके पैशांची बॅग घेऊन एन-३ कडे जाताना.