आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • February 13, Road Works, Submit Periodic Work Program

फेब्रुवारीत 13 रस्त्यांची कामे- रस्त्यांच्या कामांचा कालबद्ध कार्यक्रम खंडपीठात सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-तमाम शहरवासीयांची डोकेदुखी ठरलेल्या खड्डेमय रस्त्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मनपाच्या वतीने 15 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. दुसरा टप्पा मार्चमध्ये सुरू करण्यात येईल, असे शपथपत्र पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केले. न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास सात रस्त्यांच्या कामाच्या निविदा केव्हा काढणार, अशी विचारणा केली. शिवाय जड वाहनांना ठरवून दिलेल्या वेळेतच शहरात प्रवेश दिला जावा, असे स्पष्ट निर्देश बुधवारी दिले.

सिडकोतील अँड. रूपेश अनिल जैस्वाल यांनी खंडपीठात ‘पार्टी इन पर्सन’ जनहित याचिका दाखल करून खड्डेमय रस्ते बनवण्याची मागणी केली होती. अजिंठा, वेरूळ ही पर्यटनस्थळे जागतिक वारसा यादीत असल्याने देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ शहराकडे आहे. परंतु रस्त्यांचे हाल झाल्याने नागरिकांसह पर्यटकांचाही हिरमोड होत आहे. मागील वर्षी मनपाने रस्त्यांवर 40 ते 45 कोटी खर्च करूनही क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंप चौकापर्यंतच्या रस्त्यावर दोनशे खड्डे असल्याचे याचिकेत नमूद केले. याचिकेची प्राथमिक सुनावणी सप्टेंबरमध्ये झाली असता खंडपीठाने प्रतिवादींना नोटिसा बजावल्या. मनपाच्या वतीने बाजू मांडणारे विशेष वकील राजेंद्र देशमुख यांना अँड. अमोल जोशी, अँड. निर्मल दायमा व अँड. कुणाल काळे यांनी मदत केली.

पहिल्या टप्प्यात 13 रस्त्यांचे काम

शहरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा या विभागांशी संबंधित रस्ते आहेत. पहिल्या टप्प्यात मनपातर्फे 13 रस्त्यांचे काम करणार. कामांच्या निविदा मनपास प्राप्त झाल्या असून 18 जानेवारीला उघडल्या जातील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वर्क ऑर्डर दिली जाईल. 15 फेब्रुवारीला काम सुरू होईल. दुसर्‍या टप्प्यातील निविदा प्रक्रिया फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होऊन अखेरीस कामास सुरुवात होईल, असे शपथपत्रात नमूद केले आहे.

तटस्थ निरीक्षणाच्या तयारीचे पत्र

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी 8 जानेवारी 2014 रोजी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून मनपा विकसित करत असलेल्या रस्त्यांच्या कामावर तटस्थ संस्था म्हणून निरीक्षण करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. हे मनपाच्या वतीने खंडपीठात सादर करण्यात आले. पुणे येथील क्रिएशन इंजिनिअर्स प्रा. लि. संस्था मनपाच्या रस्त्यांचे काम करणार असून कंपनीचा अभियंता मनपात प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार असल्याचे मनपाचे विशेष सरकारी वकील राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठात सांगितले.

पहिल्या टप्प्यातील रस्ते

दिल्ली गेट ते महावीर चौक (35 मीटर रस्त्याचे काम रस्ते विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत)
औरंगपुरा ते सर्मथनगर
मिलकॉर्नर ते महात्मा फुले चौक
जळगाव रोड ते एनसीपी भवन, एन-11 सिडको
गजानन महाराज चौक ते शिवाजी महाराज पुतळा जयभवानीनगर
विवेकानंद चौक ते खिंवसरा लॉन्स - रिद्धी-सिद्धी हॉल- अष्टपुत्रे रुग्णालय- ऑगस्ट होम ते चौरंगी हॉटेल

सा.बां.विभागाने करावयाचे रस्ते

क्रांती चौक ते चिकलठाणा महामार्ग
महावीर चौक -पडेगाव ते मिटमिटा
लेमन ट्री हॉटेल ते हसरूल टी पॉइंट
दिल्ली गेट ते हसरूल
बीड बायपास रोड
शेतकी शाळा पैठण रोड ते नक्षत्रवाडी
पंचवटी चौक ते छावणी


दुस-या टप्‍प्‍यातील रस्‍ते


भाई उद्धवराव पाटील चौक ते टीव्ही सेंटर, जळगाव रोड : 2 कोटी 75 लाख 83 हजार
मध्यवर्ती नाका ते एसबीआय चौक, सिडको :4 कोटी 52 लाख 58 हजार 557
एसएससी बोर्ड ते गाडे चौक : 1 कोटी 21 लाख 3 हजार 951
मल्हार चौक ते जवाहरनगर पोलिस ठाणे : 1 कोटी 32 लाख 27 हजार 106
हॉटेल अँव्होन ते हनुमान मंदिर मुकुंदवाडी : 80 लाख 21 हजार 425
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते सतीश पेट्रोल पंपमार्गे कोकणवाडी : 2 कोटी 97 लाख 1635
तिरुमला मंगल कार्यालय ते विजया चौक : 62 लाख 14 हजार 24
लिटल फ्लॉवर हायस्कूल ते भावसिंगपुरा : 2 कोटी 67 लाख 9 हजार 474
नाईक कॉम्प्लेक्स ते एन-4 : 93 लाख 73 हजार 681)

चेलीपुरा पोलिस स्टेशन-मदनी चौक - रोशन गेट - जिन्सी - नवाबपुरा - मोंढा नाका : 2 कोटी 50 लाख 11 हजार 262
क्रांती चौक ते पैठण गेट काँक्रीट रोड : 2 कोटी 51 लाख 39 हजार 020

आनंद गाडे चौक ते रमानगर : 3 कोटी 51 लाख
पोलिस मेस : बळीराम पाटील ते आंबेडकरनगर चौक : 2 कोटी 52 लाख 6 हजार 918

गुरुवारी उघडणार निविदा

कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या निविदा भरण्याची बुधवारी अंतिम तारीख होती. ठेकेदारांच्या बहिष्कारामुळे निविदा विक्रीला मुदतवाढ देण्याची वेळ आली होती. अखेर त्यांचे मन वळवण्यात आल्यानंतर हे काम मार्गी लागले. 15 जानेवारी ही निविदा विक्रीची अंतिम तारीख होती. सायंकाळपर्यंत ठेकेदारांची निविदा दाखल करण्याची लगबग सुरू होती. उद्या गुरुवारी या निविदा उघडण्यात येणार आहेत, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाने मनपाची तासंपट्टी केल्याने प्रशासन वेगाने कामाला लागले आहे. निविदा उघडल्यानंतरची प्रक्रिया अतिशय वेगवान प्रकारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सा. बां. विभागाच्या रस्त्यांचे काय?

सुनावणीप्रसंगी खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सात रस्त्यांचे काम कधी सुरू करणार, अशी विचारणा अतिरिक्त सरकारी वकील के. एन. थिगळे यांच्याकडे केली. या प्रकरणाची माहिती घेण्यात येणार असल्याचे खंडपीठास सांगण्यात आले.