आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांत महिलांच्या उत्पन्नात दामदुपटीने वाढ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिक्षणाच्या जोरावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना भारतातील शहरी भागातल्या महिलांचे उत्पन्न वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत यात दुपटीने वाढ झाली असून महिन्याकाठी महिला सरासरी 9457 रुपये कमवू लागली आहे. यामुळे घरात सुबत्ता तर आलीच, शिवाय स्वत:वर खर्च करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना मिळाले आहे.
महिला घराबाहेर पडल्याने घराची प्रगती होत असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. भारतातील नोकरदार महिलांच्या उत्पन्नाची माहिती घेण्यासाठी ‘इंडियन मार्केट रिसर्च ब्युरो’या आघाडीच्या कंपनीने देशभरात सर्वेक्षण केले. यातून सकारात्मक माहिती समोर आली. मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये 25 वर्षे वयावरील 9 हजार महिलांना सर्वेक्षणात प्रश्नोत्तरे विचारण्यात आली. श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरातही महिलांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.
2001 मध्ये शहरी भागातील महिलांचे महिन्याकाठी सरासरी उत्पन्न 4492 रुपये होते. 2011 मध्ये ते 9457 रुपये झाले आहे. याचा परिणाम घरातील एकूण उत्पन्नावरही झाला आहे. शहरी भागातील घरात महिन्याकाठी 2001 मध्ये 8242 रुपये येत असे. ही रक्कम आता 16 हजार 509 रुपयांवर पोहोचली आहे. महिलांचे उत्पन्न वाढल्यामुळे घरात येणारा पैसाही दुपटीने वाढला आहे. हातात पैसा खुळखुळू लागल्यामुळे आता महिलांनी घराकामातूनही हात काढल्याचे हा अहवाल सांगतो. याचा एक चांगला परिणाम म्हणजे घरकाम करणा-या महिलांनाही चांगले पैसे मिळत आहेत. कंपन्या खास महिला वर्ग डोळ्यासमोर ठेवून उत्पादनांची निर्मिती करतात. यात फॅशन, सौंदर्य प्रसाधने आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये महिलांचे खरेदीचे प्रमाण 22 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर पोहोचले आहे.
बाजाराची नजर- महिलांच्या वाढलेल्या अर्थार्जनावर बाजारपेठेची करडी नजर आहे. वेतनात दुपटीने वाढ झाल्यामुळे महिलांचे खर्चाचे प्रमाणही वाढत आहे. विशेष म्हणजे खर्च करण्याबाबत त्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. हा पैसा गुंतवावा किंवा त्याची बचत करावी याकडे महिला दुर्लक्ष करताना दिसतात. पगाराचा पैसा जमा करण्यासाठी त्यांना बँकेत खाते उघडावे लागत आहे. यामुळे 10 वर्षांत महिलांच्या बँक खात्यात 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2001 मध्ये केवळ 4 टक्के महिलांकडे क्रेडिट कार्ड होते. 2011 मध्ये यात 150 टक्के वाढ झाली आहे.