आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खते मुबलक असल्याने काळाबाजार नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्के पेरणी जास्त झाली आहे. रासायनिक खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने खते आणि बियाण्यांचा काळाबाजार होणार नाही, असा विश्वास कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. आतापर्यंत 1 लाख 45 हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले असून आणखी 15 हजार मेट्रिक टन खत जुलै महिन्यात येणार आहे.

सरासरीपेक्षा यंदा 16 टक्के आणि गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के जास्त क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. त्यानुसार खताची मागणीही वाढणार आहे. जिल्ह्यासाठी तीन लाख मेट्रिक टन खताची आवश्यकता आहे. मात्र, यंदा चार लाख मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. तसेच गतवर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकर्‍यांनी खताचा वापर कमी केला होता. परिणामी गेल्या वर्षाचे 84 हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

दोन दिवसांपूर्वी 32 हजार मेट्रिक टन खत आले आहे. त्यामुळे पहिल्या खत टाकणीला आवश्यक खत उपलब्ध झाले आहे. शेतकर्‍यांना अपेक्षेप्रमाणे बांधावर खत मिळत आहे. कृषी सेवा केंद्रांतही खत उपलब्ध असल्याने खरीप हंगामात काळाबाजार होणार नाही, यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याचप्रमाणे कपाशीच्या दोन लाख पाकिटांची आवश्यकता असून कृषी विभागाने चार लाख पाकिटे मागवली आहेत. सर्वच वाणांची सरासरीपेक्षा जास्त उपलब्धता आहे.

आतापर्यंत तक्रार नाही
खताचा काळाबाजार होत असल्याची एकही तक्रार आलेली नाही. बियाण्यांबाबतीत एक तक्रार होती. तिचेही निराकरण केले आहे. खताचा तुटवडा जाणवू नये यासाठी गोदामात अडीच हजार मेट्रिक टन खत साठवून ठेवले आहे. एस. ए. कोलते, कृषी विकास अधिकारी