आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडीत औरंगपुरा, गुलमंडीवर गोविंदा पथकांत हाणामारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद- कृष्ण जन्माष्टमीचा गोपाळकाला साजरा हाेत असताना तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना गुलमंडी, औरंगपुरा परिसरात घडली. १५ ऑगस्ट रोजी रात्री या घडलेल्या दोन वेगवेगळ्या हाणामाऱ्यांत सात जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणात एका गटावर दंगलीचा, तर एका गटावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिटी चौक पोलिसांनी सांगितले. औरंगपुरा परिसरात अश्वमेध क्रीडा मंडळाच्या दहीहंडीत पाचवा थर लावून सलामी ठोकून सिद्धिविनायक पथकातील गोविंदा खाली उतरत असताना त्याचा शिवमुद्रा गोविंदा पथकातील एका गोविंदाला धक्का लागला. तेथून वादाला सुरुवात झाली आणि तुंबळ हाणामारी सुरू झाली. परंतु स्थानिकांनी त्यांच्यातला वाद थांबवला आणि दोन्ही पथकांना तेथून जाण्यास सांगितले. सिद्धिविनायक पथक चौराहा परिसरात निघून जात असताना शिवमुद्रा गोविंदा पथकाच्या सदस्यांनी त्यांना पाठलाग करून अडवले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली. त्यातील बाळू पाटणी, भरत शिंदे, दय्यू आहेर, श्याम फत्तेलष्कर आणि जांगडे यांनी विशाल कोळीसह त्याचा भाऊ प्रदीप आणि महेश साळुंके यांच्यावर दगडफेक करून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर पुढील तपास करत आहेत. 

दुसऱ्या घटनेत शिवसेनेतर्फे गुलमंडी परिसरात आयोजित दहीहंडीत जवळपास ५० सदस्य असलेल्या नागेश्वरवाडीचे साई-सावली दहीहंडी पथक सहभागी झाले होते. या पथकाने पाच थर लावून सलामी देऊन उतरल्यावर पथकातील सदस्य नाचण्यात गुंग असतानाच हरहर महादेव रणयोद्धा मंडळाच्या पथकातील सनी यादव, अर्जुन यादव, श्याम यादव, नरेन यादव, सचिन सातपुते यांच्यासह सात ते आठ जणांनी अचानक साई-सावली पथकातील गोविंदांना लोखंडी रॉड फावड्याने मारहाण सुरू केली. सनी यादव याने योगेश खंडेराव भोगे (१७, रा. झाशीची राणी चौक, नागेश्वरवाडी) याला जोराने धक्का देत त्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. यात महेंद्र शिंदे, राहुल नाईकवाडे, गोकुळ पाटील (सर्व रा. नागेश्वरवाडी) हेही जखमी झाले. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण गंभीर असल्याने दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक राजेंद्र बांगर यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...