आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Nationalist Congress Workers Beat Eachother In Phulambri

बॅनर लावण्याच्या कारणावरून फुलंब्रीत काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - बॅनर लावण्याच्या कारणावरून फुलंब्री मतदारसंघातील कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री तुफान हाणामारी झाली. हाणामारीनंतर एका कारची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी करमाड पोलिसांनी १५ जणांना अटक केली.
फुलंब्री मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते चिकलठाण्यापासून पुढे शेकट्यापर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण व कुटुंबीयांबाबत बॅनर लावत होते.
चिकलठाण्याहून स्विफ्ट कार (एमएच २० सीएस ८८५६) व एक लोडिंग रिक्षामध्ये (एमएच २० एटी ५५१०) बॅनर घेऊन कॉँग्रेस कार्यकर्ते गोलटगाव फाट्यावर आले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार समजला. ‘आमच्या उमेदवाराची बदनामी करता का,’ असा प्रश्न करत दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीला सुरुवात झाली. बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाल्याने या ठिकाणी उभ्या असलेल्या स्विफ्ट कारच्या काचा फोडण्यात आल्या. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलिस हेडकॉन्स्टेबल आर. आर. राजपूत, एल. के. थोटे, देशमुख या सहका-यांसह घटनास्थळावर धाव घेतली.

राष्ट्रवादीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांचे बदनामी करणारे बॅनर लावू न दिल्याने मारहाण करण्यात आल्याची फ‍िर्याद शंकर विश्वनाथ दाभाळकर यांनी दिली. त्यावरून काँग्रेसचे आशिष काळे, संदीप लामतुरे, लाल बेग अजिज बेग व अन्य पाच जण, तर बॅनर लावण्यात अडथळा आणला म्हणून काँग्रेसचे आशिष काळे यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीचे शंकर दाभाळकर, शरद राऊत, ज्ञानेश्वर वाघ, रशीद बेग, फुलबेग मिर्झा, बबलू जाधव, शिवाजी वाघ, तुकाराम वाघ या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपींविरोधात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. शिवाय बॅनरसह दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. निवडणुकीतील वादासंदर्भात करमाड परिसरातील हा पहिलाच गुन्हा आहे.