आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाव तसं चांगलं, पण पाण्यामुळे भांडलं, पाणी न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेताची नासधूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या दोन वर्षांत गावातून एकही तंटा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला नव्हता. पोलिसांच्या चांगल्या गावाच्या यादीत सर्वात प्रथम असणाऱ्या चित्तेपिंपळगाव जवळील एकोड पाचोड या गावात २०० ग्रामस्थांनी एका शेतकऱ्याच्या घरावर हल्ला करत पिकाची नासधूस केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. त्यामुळे गाव तसं चांगल, मात्र पाण्यामुळे भांडलं असे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांनी सांगितले.

एकोड पाचोड या गावाजवळ मदन रामविलास पुरी (२३, रा. आपतगाव) यांची ५२ एकर जमीन आहे. त्यांच्या शेतात दोन विहिरी आहेत. त्यातील गावाला लागून असलेली विहीर ग्रामपंचायतीची, तर एक विहीर पुरी यांच्या मालकीची आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचा कर्मचारी विहिरीवर पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेला असता पाण्याचा पाइप मोटारपासून वेगळा केलेला होता. हे काम पुरी यांच्या शेतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शिवाय विहिरीच्या पाण्यात काहीतरी कीटकनाशक टाकल्याची अफवा गावात पसरली.

शनिवारी रात्री काही महिला या शेताजवळ शौचासाठी गेल्या होत्या. तेव्हा शेतात काम करणाऱ्या गड्याने त्यांच्याकडे बॅटरी चमकावत शिवीगाळ केल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. हा राग मनात ठेवून रविवारी पहाटे सुमारे २०० ग्रामस्थांनी पुरी यांच्या शेतावर हल्ला केला.
या वेळी पुरी शेतात नव्हते. मात्र, त्यांचे गडी होते. त्यांना बाजूला करीत पाइपलाइनची जाळपोळ केली. ट्रॅक्टर, टेम्पो आणि दुचाकीची तोडफोड केली. १५ हजार शेवग्याच्या शेंगांची झाडे, पाच हजार डाळिंबाची रोपे गावकऱ्यांनी रागाच्या भरात तोडून टाकली. जनरेटर आणि घरातील वस्तूंना आग लावली. सालगडी शिवदार हरिभाऊ खके, भाग्यश्री बसलिंग खके, विठ्ठल बुजारी हाके, बसलिंग हाके,लहान मुले घटनास्थळी होते. एकदम धावून आलेल्या २०० ग्रामस्थांना पाहून सर्व घाबरले.

कायदा हातात घेऊ नये
पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे अशा प्रकारे वाद होण्याची शक्यता वाढली आहे. गावात विहिरीच्या अधिग्रहणाविषयी वाद असल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावा. त्यात प्रशासनाच्या मदतीने योग्य मार्ग काढला जाईल. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ नये.
- सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी