औरंगाबाद- प्रेमप्रकरणातून विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात तुंबळ हाणामारी झाली. यात सात जण जखमी झाले. हा प्रकार घडला तेव्हा तेथे नेमकी भाजपची सदस्य नोंदणी मोहीम सुरू होती. त्यामुळे आमची मोहीम उधळून लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजयुमोने केला, तर दुस-या गटाने हे प्रकरण मिटवण्याची भाषा सायंकाळी चालवली. दुस-या गटातील मुले ही सिल्लेखान्यातील रहिवासी असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी विधर्मीय युगुल महाविद्यालयाच्या प्रांगणात बोलत होते. बाजूलाच भाजप सदस्य नोंदणीसाठी मंडप टाकण्यात आला होता. तेथील भाजयुमोच्या एका पदाधिका-याने आक्षेप घेतला. यावरून वादावादी झाली. तेव्हा तो मुलगा तेथून निघून गेला. मात्र, दुपारी सिल्लेखान्यातील टोळक्यासह तो तेथे दाखल झाला. विशेष म्हणजे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील नेमकेच तेथून गेले अन् हे टोळके तेथे आले. त्यांनी कार्यकर्त्याला मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी प्रतिहल्ल्यात टोळक्यातील पाच जणांना बेदम मारहाण केली. पोलिस येईपर्यंत सिनेस्टाइल हाणामारी सुरू होती. त्यानंतर टोळक्यातील काही जण पळून गेले. भाजयुमोचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही बाजूंनी तक्रारी होणार, असे स्पष्ट झाले होते. परंतु सिल्लेखान्याच्या टोळक्यातील एकाच्या वडिलांनी हेडगेवार रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली तसेच हे प्रकरण पोलिसांत जाता बाहेरच मिटवून टाकण्याची सूचना केली. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्याचा निर्णय दोन्हीही बाजूंनी झाला. परिणामी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.
मंडप उधळण्याचा डाव
मी तेथे नव्हतो, पण हा प्रकार दुर्दैवी आहे. आमचा मंडप उधळण्याचा कट होता. आमचे दोन कार्यकर्ते जखमी झालेत. आधी त्यांच्यावर उपचार करतोय. त्यानंतर तक्रार देण्याचे बघितले जाईल. हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती नाही. मनोजभारस्कर, शहराध्यक्ष,भाजयुमो.