आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • File Criminal Charages Against Oriental Officers

‘ओरिएंटल’च्या अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बनावट लाइफलाइन कंपन्यांच्या नावाखाली सामान्य विमाधारकांना कोट्यवधींचा गंडा घालणा-या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबादचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (लोहमार्ग) आर.एस.साळगावकर यांनी नुकतेच बजावले आहेत. या प्रकरणी तक्रार करूनही सीबीआय व केंद्रीय दक्षता पथकाने कारवाई न केल्यामुळे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश शिंदे यांनी याचिका दाखल केली होती.


याचिकेमध्ये म्हटले आहे की, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या औरंगाबाद व नगर विभागातील अधिका-यांनी कमिशनखोरी आणि अल्पावधीत गब्बर होण्याच्या उद्देशाने नातेवाईक व मित्रांच्या मदतीने बनावट लाइफलाइन कंपन्यांचे जाळे तयार केले. 1998 पासून 2011 पर्यंत या 22 पेक्षा जास्त अधिका-यांनी व बनावट कंपन्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले.


नगरपासून प्रारंभ
लाइफलाइनची पहिली कंपनी सुधाकर निवृत्ती सोनसळे यांनी 1998 मध्ये नगर येथे सुरू केली. या लाइफलाइन कंपन्यांना केंद्र सरकार, जनरल इन्शुरन्स कॉर्पाेरेशन, आयआरडीए, दि ओरिएंटल इन्शुरन्स यांचे कोणतेही परवाने नसताना सोनसळे यांनी विमा पॉलिसी विकण्यास सुरुवात केली. या बोगस विमा कंपन्यांच्या प्रत्येक मेळाव्यात अधिकारी प्रत्यक्ष हजर राहत असल्याने सामान्यांचा विश्वास बसत गेला आणि आणखी कंपन्या उदयास आल्या. या कंपन्यांचा व्यवसाय अहमदनगर, औरंगाबाद या दोन विभागांतर्गत येणा-या कार्यालयांमधून होत होता. हा सर्व व्यवसाय ‘एमएलएम’ (मल्टिलेव्हल मार्केटिंग) सुरू असल्याचे औरंगाबादमधील ‘ओरिएंटल’चे तत्कालीन अधिकारी डी. झेड. इंगोले यांच्या लक्षात आले. त्यांनी 2004 मध्ये औरंगाबादेत हा व्यवसाय बंद करण्याचे लेखी आदेश दिले होते, परंतु तरीही हा फसवणुकीचा धंदा सुरूच होता.


या अधिका-यांनी चालवली ‘लाइफलाइन’
सुधाकर निवृत्ती सोनसळे (औरंगाबाद), हसमुख शहा (औरंगाबाद), ए. पी. कुलकर्णी (औरंगाबाद), अरविंद रविकर (औरंगाबाद), रमेश नाकाडे (जालना), राजेंद्र चौकेकर (नागपूर), अशोक शिंदे (इंदूर), साहेबराव पाचपुते (बडोदा), दीपक तिवारी (अहमदनगर), मिलिंद डोळे (श्रीगोंदा), दीपक भालेराव (मुंबई), ज्योती मुतालिक (अहमदनगर), संजय लाटे (अहमदनगर), एम. एस. कुमार (नागपूर), व्ही. जी. कांत (पुणे), एम. एम. वैद्य (पुणे), दिलीप पाटील (हुबळी), डी. सी. कर्पे (कोपरगाव), एस.के. काचोळे (नाशिक), राहुल दुग्गल (दिल्ली), सुनील वाळेकर (पुणे), एस. आर. साखरे (लातूर). (कंसात सध्याचे नियुक्तीचे ठिकाण)


पॉलिसी प्रीमियमचे दर (शासकीय नियमानुसार)
> जनता पर्सनल अ‍ॅक्सिडेंट पॉलिसी- एक लाखासाठी 60 रुपये वार्षिक प्रीमियम
> पर्सनल अ‍ॅक्सिडेंट- एक लाखासाठी 45 रुपये वार्षिक प्रीमियम
> नागरी सुरक्षा पॉलिसी - एक
लाखासाठी 90 रुपये वार्षिक प्रीमियम


बोगस कंपन्यांकडून लूट
या बोगस कंपन्यांनी विमाधारकांकडून कमीत कमी पंधराशे आणि जास्तीत जास्त सोळा हजार रुपयांचा प्रीमियम घेतला होता. मात्र, ओरिएंटल कंपनीत रक्कम जमा करताना शासकीय दरानुसारच रक्कम जमा केली. उर्वरित रक्कम अधिकारी व कंपनीच्या संचालकांनी वाटून घेत स्वत:चे खिसे भरल्याचे उघड झाले आहे.


बनावट विमा कंपन्या
> लाइफकेअर मल्टी सर्व्हिसेस प्रा.लि., औरंगाबाद
> नवजीवन लाइफलाइन सर्व्हिसेस प्रा.लि., औरंगाबाद
> जीवन आनंद प्रा. लि., औरंगाबाद
> लाइफलाइन लाइफकेअर लि., औरंगाबाद
तक्रारी माझ्याकडे आल्यानंतर मी पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र न्याय न मिळाल्याने हे प्रकरण न्यायालयात दाखल केले असून योग्य तपास केल्यास महाघोटाळा उघड होऊ शकतो. -नीलेश शिंदे, तक्रारदार