आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या बनियनने केली "त्या' तिघा मुन्नाभाईंची पोलखोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काळा बनियन घालून आलेल्या उमेदवारांवर विशेष लक्ष द्या, अशा सूचना पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तपासणी केली असता राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक १४ च्या शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी करणाऱ्या तीन मुन्नाभाईंना पकडण्यात आले. या तिघांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदन कपूरसिंग जारवाल (२२, रा. कौचलवाडी, ता. अंबड), विजयसिंग रतनसिंग जारवाल (रा. पैठण), जीवन गोविंद सरावंडे (२२, रा. कौचलवाडी, ता. अंबड) असे कॉपी करणाऱ्यांची नावे आहेत.
शारीरिक चाचणीनंतर ११ एप्रिल राेजी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी ८६९ उमेदवार बसले होते. प्रत्येक उमेदवाराची बारकाईने तपासणी करा, असे आदेश समादेशक निसार तांबोळी यांनी दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक फकिरा घुगे हे तपासणी करत असताना एका उमेदवाराने काळे बनियन घातले होते. त्याची बारकाईने तपासणी केली असता त्याच्या कानात लहान टिकलीसारखे मायक्रोफोन होते. त्यासाठी लागणारे वायर बनियनच्या काठातून ओवले होते तर बनियच्या एका बाजूला फोनचे कीट लावले होते. मदन आणि विजयसिंग या दोघांनी असा प्रकार केला होता. तर जीवन सरावंडे याच्या भावाने शारीरिक चाचणी दिली होती आणि तो लेखी परीक्षेसाठी आला होता. मात्र पोलिसांच्या बारीक नजरेतून तो देखील सुटला नाही. निसार तांबोळी यांनी या तिघांची चौकशी केली. पोलिस निरीक्षक घुगे यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

कॉपीच्या प्रयत्नात पकडण्यात आलेल्या मदन जारवाल याच्याकडे विविध प्रकारचे १६ आयकार्ड सापडले आहेत. यातील एकाचा भाऊ हा पोलिसमध्ये असून हे रॅकेट आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.