आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत औरंगाबाद शहरामध्ये होणार ‘फिल्म इन्स्टिट्यूट’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत उत्तम टॅलेंट आहे, मात्र योग्य प्रशिक्षण आणि संधीअभावी कलावंताचे स्वप्न भंग होते. अचूक मार्गदर्शन मिळाल्यास यशाचा मार्ग सुकर होतो, माझ्या अनुभवांचा आणि इतकी वष्रे सिनेसृष्टीत काम केल्याचा फायदा येथील गुणी कलावंतांना व्हावा, यासाठी मी दीपोत्सवात ‘फिल्म इन्स्टिट्यूट’ची घोषणा करणार असल्याचे प्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन यांनी सांगितले. खासगी कामानिमित्त शहरात आले असता ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने सेन यांच्याशी संवाद साधला तो त्यांच्याच शब्दांत..

‘सूरमा भोपाली’पासून ‘आईना’, ‘ये दिल्लगी’, ‘जिद्दी’, ‘सलाखें’, ‘अर्जुन पंडित’ सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे संगीत मी आणि माझे काका समीर सेन यांनी दिले. 2012 मध्ये आम्हाला फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1988 पासून वैविध्यपूर्ण संगीत देणारी आमची जोडी 2000 मध्ये एकमेकांपासून वेगळी झाली आणि जणू करिअर तेथेच थांबले. आम्ही सूरमा भोपाली चित्रपट 1988 मध्ये करायला घेतला खरा, मात्र आमचा हा चित्रपट पाच वर्षांनी प्रदर्शित झाला. पाच वर्षांच्या काळात जेव्हा आम्ही रस्त्याने जायचो तेव्हा लोक आमची खिल्ली उडवताना म्हणायचे ‘वो देखो नकली म्युझिक डिरेक्टर्स जा रहे है’ आम्हाला वाईट वाटायचे पण प्रत्युत्तर द्यायला काहीच नव्हते. यशराज बॅनरचा ‘आईना’ चित्रपट मिळाला. 93 मध्ये आमचे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटाने आम्हाला ओळख मिळवून दिली. यानंतर अनेक चित्रपटांसाठी आमच्याकडे रांगा लागल्या.

1994 ला काजोल, अक्षय कुमार आणि सैफ अलीचा ‘ये दिल्लगी’ करण्याची संधी यशजींनी दिली. आम्ही प्रसंगानुसार ट्रॅक बनवले, ‘ओले ओले..’ वगळता सर्व गाणी यशजींना ऐकवली. कारण, ते गाणे असे काही विचित्र आहे की आपल्या हातातून चित्रपट जाईल अशी भीती वाटत होती, पण त्यांच्याकडे काम करणारी एक मुलगी त्यांना म्हणाली ‘एक अतरंगीसा गाणा भी दिलीप भाईने बनाया है पर सूना नही रहे है, वो गाना बहोत चलेगा एैसा मुझे लगता है’ मग यशजींनी ते गाणे ऐकवण्याची फार्माईश केली. ते आवडले. पुढे हेच गाणे कितीतरी दिवस टॉप टेनमध्ये राहिले. एका गाण्याने एका रात्रीत आम्हाला स्टार केले होते. रिअँलीटी शोने मनोरंजन होत नाही किंवा कलावतांना व्यासपीठही मिळत नाही. तर, या शोच्या माध्यमातून चॅनलचा व्यवसाय होतो. लोकांना गुंतवून चॅनलची टीआरपी वाढवायचा आणि पैसा कमावण्याचा हा धंदा आहे. कुठल्या रिअँलिटी शो मधला कलावंत आज इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, याचा विचार प्रेक्षकांनीही करायला हवा.

(शब्दांकन - रोशनी शिंपी)