आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अखेर जनरेट्यापुढे सिडको नमले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटीतील एका डॉक्टरने भूखंड बळकावून 30 वर्षे ताब्यात ठेवला. त्यावर वृत्त प्रसिद्ध करताच सिडकोत खळबळ उडाली. अधिकार्‍यांनी पाहणी केली आणि अतिक्रमणही काढले खरे पण, कारवाई अर्धवटच केली. डीबी स्टारने हा प्रश्न लावून धरत पुन्हा वृत्त प्रसिद्ध करताच या दणक्याचा परिणाम झाला आणि अखेर सिडकोने हा प्लॉटच ताब्यात घेतला. डीबी स्टारमुळे कॉलनीवासीयांनाही बळ मिळाले. केवळ ताबा नव्हे, तर महिंद्रा यांनी बांधलेली संरक्षक भिंतही पाडा, असे म्हणत कॉलनीवासीयांनी सिडको प्रशासकांना घेराव घातला. अखेर या जनरेट्यापुढे सिडको नमले आणि डॉ. महिंद्रा यांनी बांधलेली संरक्षक भिंत जमीनदोस्त केली. शिवाय या भूखंडावर कायमस्वरूपी सुरक्षारक्षकही नेमण्यात आला आहे.


सिडको एन-5 मधील श्री नगर कॉलनीतल्या मोकळ्या जागेवर घाटीतील डेंटल कॉलेजच्या ऑर्थोडोंटिक्सचे विभागप्रमुख डॉ. राजन महिंद्रा यांनी तब्बल 30 वर्षांपासून अतिक्रमण केले होते. या प्रकाराला डीबी स्टारने 7 फेब्रुवारीच्या अंकात ‘डॉक्टरांचे अतिक्रमण, सिडकोची मलमपट्टी’ या मथळ्याखाली वाचा फोडली. यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांसह कॉलनीला भेट देऊन जागेची पाहणी केली. त्याची दखल घेत सिडकोने 28 फेब्रुवारी रोजी डॉक्टरांच्या अतिक्रमणावर हातोडा चालवला आणि ही जागा सिडकोच्या मालकीची असल्याचा फलक तेथे लावला. अर्थात ही कारवाई करताना डॉ. महिंद्रा यांच्यावर कृपादृष्टी असणार्‍या सिडकोच्या अधिकार्‍यांनी अर्धवटच कारवाई केली होती.

डॉक्टरांनी या मोकळ्या जागेवर पक्की संरक्षक भिंत बांधली होती. सिडकोने ती तशीच ठेवत त्याच्या भोवताली तारेचे कुंपण घातले, पण ही भिंत पाडावी यासाठी नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला. सिडको दाद देत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी प्रशासकांना घेराव घातला. या प्रकरणापासून आतापर्यंत दूर राहणार्‍या येथील नगरसेविका रेखा जैस्वाल यांनीही नागरिकांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. यामुळे अखेर सिडकोला नमते घ्यावे लागले आणि मंगळवार, 12 मार्च रोजी डॉक्टरांची संरक्षक भिंत आणि पायर्‍यांवर हातोडा चालवला. या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी सिडकोने कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमला आहे.


याप्रसंगी शंकरराव जोशी, विजय म्हैसकर, जी.एम. पाटील, अशोक पाटील, शैलेश अग्रवाल, नितीन खरात, प्रवीण कुलकर्णी, सुभाष लोखंडे, दीपक अग्रवाल, सुनील ठोंबरे, पंकज नेमाडे, श्री निवास कुलकर्णी आदी नागरिक उपस्थित होते.
आंदोलनाला यश आले
सिडकोने यापूर्वी केलेली कारवाई अर्धवट होती. आमच्या एकजुटीपुढे त्यांना नमावेच लागले. या प्रकरणात डीबी स्टारने केलेले सहकार्य मोलाचे ठरले आहे.
प्रवीण कुलकर्णी
बोअर कॉलनीसाठी द्यावी
ही जागा आता जनतेच्या मालकीची झाली आहे. येथे एक बोअर आहे. ती नागरिकांसाठी खुली करून द्यावी. यामुळे आम्हाला पाणीटंचाईवर मात करता येईल.
पंकज नेमाडे
खैरेंनी आश्वासन पाळावे
ही जागा लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी उपलब्ध करून द्यावी. खासदार चंद्रकांत खैरे यांनी येथे खेळणी आणि बाकडे बसवण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण करावे. विजय म्हैसकर