आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ‘त्या’ शेतकर्‍याला वीज जोडणी मिळाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चिकलठाणा येथील एका शेतकर्‍याला महावितरण व जीटीएलमध्ये असलेल्या हद्दीच्या वादामुळे एक वर्षापासून वीज मिळत नव्हती. त्यामुळे त्याचे उभे शेत जळाले. डीबी स्टारने या प्रश्नाला वाचा फोडली. त्यानंतर शेतकर्‍याला वीज जोडणी मिळाली. दोन्ही कंपन्यांनी संयुक्त सर्वेक्षण केले. त्यानंतर जीटीएलने जबाबदारी स्वीकारत शेतकर्‍याच्या शेतापर्यंत खांब टाकून वीज जोडणी दिली.

चिकलठाण्याच्या पुढे केंब्रिज शाळेच्या मागील परिसरात कैलास रिठे या तरुण शेतकर्‍याची सहा एकर शेती आहे. तेथे मोसंबीची बाग तयार करण्यासाठी कैलास रिठे यांनी पाच लाख रुपये खर्च करून भली मोठी विहीर बांधली. विहिरीला भरपूर पाणीही लागले, पण महावितरण आणि जीटीएल दोन्हीही वीज जोडणी देत नव्हते. रस्त्यापासून त्याचे शेत अर्धा किमी अंतरावर आहे. खांब व वीज तारांचे पैसेही द्यायला कैलास रिठे तयार होते, पण महावितरण व जीटीएलमध्ये हद्दीचा वाद झाला. या दोघांच्या वादात रिठे यांना वीज न मिळाल्याने त्यांची मोसंबीची उभी बाग जळाली.ऑगस्ट 2012 मध्ये त्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. पावसाळा गेला, हिवाळा संपला, शेतही जळून गेले; पण त्यांना जोडणी मिळाली नाही. शेवटी रिठे यांनी डीबी स्टारकडे धाव घेतली. चमून 13 एप्रिल 2013 रोजी ‘हद्दीच्या वादात शेत जळाले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली. त्यानंतर महावितरण व जीटीएलच्या अधिकार्‍यांनी संयुक्त सर्वेक्षण केले. त्यातून हा भाग जीटीएलच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जीटीएलने रिठे यांच्या शेतापर्यंत पोल टाकून वीज जोडणी दिली.


डीबी स्टारमुळे काम झाले
महावितरण व जीटीएलच्या अधिकार्‍यांकडे मी एक वर्षापासून चकरा मारत होतो, पण कुणीही दाद दिली नाही. त्यामुळे माझे उभे शेत जळाले. डीबी स्टारने वाचा फोडताच माझे काम झाले.
शेतकरी ,चिकलठाणा


आम्ही वीज दिली
महावितरण व जीटीएलच्या सीमारेषा स्पष्ट नव्हत्या. त्यामुळे रिठे यांना त्रास झाला; पण आम्ही शेवटी त्यावर तोडगा काढला व रिठे यांना वीज जोडणी दिली.
समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी,जीटीएल