आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरणी खासदार चंद्रकांत खैरेंविरुद्ध गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ यांच्यासह 30 जणांवर सरकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. खासदार खैरेंवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण
औरंगाबादच्या वाळूज भागात मंदिराचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या शिवीगाळीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. त्यावर खैरे यांनी शासकीय कामात अडथळा आणला काय याचा खुलासा करावा, असे निर्देश शनिवारी न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. दरम्यान, तहसीलदार रमेश मुनलोड महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन खैरेंविरुद्ध तक्रार दिली होती. या तक्रारीनूसार खासदार खैरेंसह 30 जणांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण गेले न्यायालयात
खैरे यांच्या शिवीगाळ प्रकरणी कारवाई करावी, अशा मागणीची जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते भगवानजी रायानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारतर्फे बाजू मांडताना महाधिवक्ता श्रीहरी अणे म्हणाले, ‘अशी घटना घडल्याची माहिती सरकारकडे आहे. मात्र, त्याबद्दलची नेमकी आणि विस्तृत स्वरूपाची माहिती नाही. अशा पद्धतीची औरंगाबादमधील ही दुसरी घटना आहे.’

तक्रार शुक्रवारी, गुन्हा सोमवारी?
तहसीलदार मुनलोड यांच्यासह अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची प्रत ‘दिव्य मराठी’च्या हाती लागली होती. मात्र, त्यावर मुनलोड यांची स्वाक्षरी नाही. खैरेंविरुद्ध गुन्हा नोंद झाला किंवा नाही, याबाबत काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला होता. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा दाखल झाला नाही, असे सांगितले होते. त्यामुळे शुक्रवारी दिलेल्या तक्रारीवरुनच गुन्हा दाखल झाला की नंतर परत तक्रार देण्यात आली हे अद्याप स्पष्ट नाही.
काय म्हणाले तहसीलदार
मी कर्तव्य बजावत होतो. खैरेंनी जे काही केले ते व्हायरल झाले. माझी बदनामी झाली आहे. आता अधिकाऱ्यांची संघटनाच योग्य तो निर्णय घेईल.
-रमेश मुनलोड, तहसीलदार

माझे बोलणे सर्वांच्या मोबाइलवर आहे. नेमके काय म्हणालो ते आठवत नाही. पण मंदिरे पाडली जात असतील तर काय करायचे ते करीन. देह सोडण्याची तयारी आहे. हिंदूंच्या विरोधातील एकालाही सोडणार नाही.
- खा.खैरे

काय घडले होते त्या दिवशी


औरंगाबाद मधील बजाजनगर,वाळूज एमआयडीसी येथील संत नरहरी महाराजांचे मंदिर अतिक्रमित असल्याने ते पाडावे, असे न्यायालयाचे आदेश होते. त्यानुसार बुधवारी, 28 ऑक्टोबरला कारवाई सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास खासदार खैरे घटनास्थळी पोहोचले. ते थेट पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, धनंजय येरुळे यांच्या अंगावर चालूनच गेले. ‘कोणी सांगितले तुम्हाला मंदिर पाडायला? कोणाचा आदेश आहे? तुम्ही पोलिसवाले मंदिरापासून चालते व्हा. कुणीही इथे थांबता कामा नये’ असेही धमकावले. एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी ‘मार खायचा नसेल तर निघून जा’,असे म्हणून पिटाळले.तहसीलदार रमेश मुनलोड शासकीय वाहनात बसून मोहिमेचा आढावा घेत होते. खैरे त्यांच्याकडे गेले आणि त्यांना थापड मारली. तसेच शिवीगाळ केली. ‘का रे? कुणाच्या आदेशाने मंदिर पाडायला निघालास?’ असा प्रश्न खैरेंनी विचारला. मुनलोड म्हणाले, ‘न्यायालयाच्या आदेशानुसारच कारवाई सुरू आहे.’ त्यावर खैरे म्हणाले, ‘हिंदूंची मंिदरे पाडतोस काय? तुझ्यात हिंमत असेल तर इतर धर्मीयांची न्यायालयाने अतिक्रमित सांगितलेली धार्मिक स्थळे पाडून दाखव. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त औरंगजेबाचे सैनिक आहेत. मी किती दिवसांपासून गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याचे सांगतो. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. तुम्ही सर्व लोक चोर आहात.’ हा सर्व प्रकार स्थानिक वृत्तवाहिनीचा कॅमेरामन शूट करत होता. ते लक्षात येताच खैरे त्याच्यावर भडकले आणि त्यालाही कॅमेरा बंद करण्यास भाग पाडले. तेथून ते मंदिरांमध्ये गेले आणि तेथे मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर मोहटादेवी मंदिराजवळ पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस,भाजप जिल्हा तसेच पोलिस प्रशासनावर तोंडसुख घेतले.
बातम्या आणखी आहेत...