आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशमन विभागाला महिलांचे वावडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक क्षेत्रात महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाचा नियम आहे; परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. शहरातील अग्निशमन विभागात सध्या 60 कर्मचारी आणि 10 अधिकारी आहेत. त्यात एकही महिला नाही. या आकडेवारीनुसार प्रत्यक्षात 33 टक्यांचा हिशेब लक्षात घेतला तर किमान 23 महिला या विभागात पाहिजेत. यावर महिलांचे अर्ज कधी आलेच नाहीत, त्यामुळे 1994 पासून भरतीच झाली नसल्याचे अधिकारी सांगतात.
शहरातील अग्निशमन विभागात 60 कर्मचारी, तर 10 अधिकारी असे एकूण 70 जण आहेत; पण त्यात महिलांची भरती करण्याबाबत उदासीनता दिसून येते. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कर्तृत्व गाजवतात; पण या क्षेत्रात मात्र अर्जच येत नसल्याचे मनपाचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे शहर व राज्यातील अन्य ठिकाणी असलेल्या फायर ब्रिगेड स्कूलमध्ये कोर्स करून प्रशिक्षित झालेल्या अनेक मुली शहरात आहेत. त्या या क्षेत्रात काम करण्यास सज्ज आहेत. परंतु, शहरातील अग्निशमन दलात 1994 पासून महिलांची भरतीच झालेली नाही. फायर अँक्ट लागू असूनही त्याचे पालन होत नाही, ही खरी शोकांतिका आहे. महिला दिनानिमित्त डीबी स्टारने तपास केला असता हे सत्य पुढे आले. परिणामी खासगी क्षेत्रात काम करून त्यांना समाधान मानावे लागत आहे.
निसर्गदत्त क्षमतांच्या बाबतीत नियतीकडून स्त्रियांवर कुठलाही अन्याय झालेला नाही. झाला तो विपरीत समाजव्यवस्था आणि चुकीच्या विचारपद्धतीमुळे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि कर्तृत्वाच्या प्रत्येक प्रांगणात स्रिया पुरुषांची बरोबरी करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. तरीही अनेक क्षेत्रांत त्यांना आजही प्रवेश नाकारला जातो. अगदी शासकीय पातळीवरही त्यांच्यावर अन्याय होत आला आहे. वैमानिकापासून ते पोलिस अधिकार्‍यांपर्यंत विविध क्षेत्रांत ठसा उमटवणार्‍या महिलांना फायर ब्रिगेडसारख्या विभागात मात्र घेतले जात नाही. आपल्या औरंगाबादमध्येही हीच स्थिती आहे. मुंबई, चेन्नईसारख्या शहरांत महिलांनी या क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे. मात्र, काही मोठी शहरे वगळता औरंगाबादसह राज्यात अन्य ठिकाणी महिलांची भरती होत नाही.
आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी दोन-तीन मुलींचे अँडमिशन असते. येथून प्रशिक्षण घेणार्‍या मुली गुजरातमध्ये फायर ऑफिसर म्हणून काम करत आहेत.
नंदकिशोर मांडवकर, संचालक, परमानंद कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट
चार महिन्यांपूर्वी मी पदभार घेतला. मला आधीची काहीही माहिती नाही. क्लास- दोन आणि तीनचे काम माझ्याकडे आहे. रिक्त पदांची माहिती घेऊन त्याच्यावर काम करू.
भालचंद्र पैठणे, आस्थापना अधिकारी
आमच्याकडे डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी आणि डिप्लोमा इन फायर सर्व्हिस इंजिनिअर हे दोन कोर्स आहेत. दरवर्षी चार-पाच मुली तर यावर्षी आठ मुलींनी प्रवेश घेतला आहे. येथील मुली मुंबई, नाशिक, दिल्लीत काम करताहेत.
पंकज लोखंडे, संचालक, कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट