आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 लाख जनतेसाठी केवळ 50 कर्मचारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-नारेगाव येथील भंगाराच्या गोदामाला मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल 12 तास झुंज द्यावी लागली. या अनुषंगाने आज ‘दिव्य मराठी’ने माहिती घेतली असता अग्निशमन दलात कर्मचा-यांची संख्या तोकडी असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी बराच वेळ लागल्याचे सत्य समोर आले.
अग्निशमन दलाची शहरात चिकलठाणा, सिडको आणि मुख्य पदमपुरा अशी तीन केंद्रे आहेत. या तिन्ही केंद्रांमध्ये 50 कर्मचारी असून आठ तासांची ड्यूटी असतानाही ते बारा-बारा तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करतात. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने अग्निशमन दलाची दहा केंद्रे असायला हवी. शासकीय नियमानुसार 50 हजार लोकसंख्येमागे एक केंद्र हवे. मात्र मनपा याकडे दुर्लक्ष करत आहे. अग्निशमन दलाच्या एका बंबावर जेथे सहा कर्मचाºयांचे पथक हवे. तेथे कर्मचाºयांची संख्या तोडकी असल्याने चार जणांचे पथक घटनास्थळी पाठवण्याची नामुष्की ओढवली आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडसारख्या महापालिकेने शहराची लोकसंख्या पाहता तेथे अग्निशमन दलात 1 हजार 600 कर्मचाºयांची भरती केलेली आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात लागलेली आग तत्काळ आटोक्यात आणली जाते.
ग्रामीण भागाचाही भार...

ग्रामीण भागात अग्निशमन दल नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही या अग्निशमन दलाला जावे लागते. त्याचसोबत मराठवाडा आणि राज्यातील कोणत्याही शहरात आग विझविण्यासाठी जावे लागते. ग्रामीण भागातही अग्निशमन दलाची स्थापना व्हायला हवी, जेणेकरून आग लवकर आटोक्यात आणली जाऊ शकते. तसेच आर्थिक हानी यामुळे टळू शकते, अशी माहिती जवानांनी दिली.

जवानांचा जीव कवडीमोल...

नेहमी आग आणि पाण्याशी झुंज देणा-या अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी स्वत:चा विमा स्वत:च काढलेला आहे. महापालिकेने या जवानांचा त्यांच्या पदानुसार ग्रुप विमा काढला आहे. ऑन ड्यूटी अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी रक्कमही आजघडीला तशी कवडीमोलच असल्याचे काही जवानांनी सांगितले.