आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीमध्‍ये शॉर्टसर्किटने तीन ठिकाणी आग; दाेन मुलांना वाचवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज - फुलंब्री तालुक्यातील शेवता खुर्द, गणोरी आणि गेवराई गुंगी येथे विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणगीमुळे गोठ्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या. शेवती खुर्द येथ्ज्ञे घराशेजारील गोठ्याला लागलेल्या आगीत तीन बैल, चार बकऱ्या दगावल्या असून एक गाय, एक बकरी व बकरीची दोन पिल्ले भाजल्याने गंभीर आहेत.
 
आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील घरालाही आग लागून संसारोपयोगी साहित्य असे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, गोठ्यातील जनावरे वाचवण्याच्या प्रयत्नात दोन मुले गोठ्यात अडकली होती. ग्रामस्थांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
 
सोमीनाथ तुपे व दादाराव तुपे हे दोघे भाऊ शेवता गावापासून एक किमी अंतरावरील गट क्रमांक १२७ मध्ये शेतात राहतात. यांच्या घरांच्या शेजारीच गोठा आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता घरावरून व गोठ्यावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणाने आगीच्या ठिणग्या गोठ्यावर पडल्या. यामुळे ही आग लागली. आगीमुळे गोठ्यातील जनावरे ओरडू लागल्याने बाजूला असलेल्या दहा ते बारा वर्षे वयोगटातील दाेन मुलांनी गोठ्याकडे धाव घेतली आणि जनावरांची आगीपासून सुटका करण्यासाठी सोडत असताना आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन मुलांना बाहेर काढले.  सोमीनाथ तुपे यांच्या मालकीचे दोन बैल व एक बकरी दगावली, तर दादाराव तुपे यांच्या मालकीचा एक बैल, तीन बकऱ्या दगावल्या.
 
दोन बकऱ्या, दोन पिल्ले व एक गाय गंभीर जखमी आहे. गोठ्यातील शेतीपयोगी अवजारे, जनावरांचा चारा, चाळीस पत्रे, ठिबक जळून खाक झाले. वडोदबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तहसीलदार संगीता चव्हाण, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, जि. प. सदस्य शिवाजी पाथ्रीकर यांनी भेट दिली असून पंचनामा केला.
बातम्या आणखी आहेत...