आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 90 टक्के दुकानांत अग्निशमन यंत्रे नाहीत !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगपुरा, टिळकपथ, गुलमंडीच्या बाजारपेठेत लाखोंची उलाढाल करणार्‍या व्यापार्‍यांनी अग्निशमन यंत्रणा बसवण्याबाबत मात्र साफ उदासीनता दाखवल्याचे समोर आले आहे. मोठे शोरूम्स वगळता जवळपास 90 टक्के दुकानांत आग विझविण्याचा साधा फायर एक्सिं्टग्विशर नाही. काल औरंगपुर्‍यात इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर ही चिंताजनक स्थिती समोर आली आहे.
औरंगपुर्‍यातील नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स या तीनमजली दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. केवळ सुदैवानेच ही आग इतरत्र पसरली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर दाटीवाटीच्या भागातील बाजारपेठांतील व्यापारी अग्निशमन यंत्रणा बसवण्याबाबत किती जागरूक आहेत हे पाहण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने टिळकपथ, औरंगपुरा, गुलमंडी भागातील दुकानांचा फेरफटका मारला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. टिळकपथ ते गुलमंडी या भागात अतिशय दाटीवाटीने दुकाने थाटली गेली आहेत. यापैकी काही मोठी दालने वगळता बाकी व्यापार्‍यांनी अग्निशमन यंत्रणेकडे लक्षच दिलेले नाही. अनेक दुकानांत सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, पण फायर एक्सिंटग्विशर मात्र बहुतेक दुकानांत दिसत नाही. याबाबत विचारणा केली असता कधी गरज पडली नाही, असे स्पष्ट सांगणारेही व्यापारी भेटले.

बाजारपेठेत का हवी यंत्रणा : अत्यंत दाटीवाटीने असलेल्या या दुकानांपैकी एखाद्या ठिकाणी दुर्दैवाने आगीची घटना घडली तर आजूबाजूच्या दुकानांनाही धोका निर्माण होतोच. शिवाय दुकाने मोकळीढाकळी नसल्याने आग पसरण्याचाही धोका आहे. कायम गर्दी असणार्‍या या बाजारपेठेत आगीचा धोका अधिक गंभीर परिणाम करू शकतो.

व्यापारी महासंघ पुढाकार घेणार : टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा या बाजारपेठेत एका रांगेत दुकाने आहेत. त्यामुळे सर्वच व्यापार्‍यांनी खबरदारी घ्यायची आवश्यकता आहे. विशेषकरून विजेचा वापर अधिक होत असल्याने वीज उपकरणांच्या बाबतीत अधिक सतर्कतेने काम करायला हवे. याशिवाय अग्निशमन यंत्रे दुकानांत असणे अत्यावश्यक बनले आहे. याबाबत व्यापार्‍यांना उद्युक्त करण्यासाठी व्यापारी महासंघ लवकरच मोहीम हाती घेणार आहे. त्यात व्यापार्‍यांना धोक्याची जाणीव करून देत उपाय करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली जाणार आहे, असे व्यापारी महासंघाचे आदेशपालसिंग छाबडा यांनी सांगितले.