आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire In Aurangabad Municipal Corporation Maharashtra

औरंगाबाद महापालिकेत आग; नियुक्तीच्या 1124 फायली खाक, पाच कर्मचारी निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद- महापालिकेतील बहुचर्चित चतुर्थर्शेणी कर्मचारी नोकर भरतीसंदर्भातील 1124 संचिकांना आग लागल्यामुळे त्या जळून खाक झाल्या. ही आग मंगळवारी (5 फेब्रुवारी) सकाळी आठ वाजता लागली. आगीस जबाबदार धरून एक आस्थापना अधिकारी आणि चार सुरक्षारक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. हे आदेश आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले. आगप्रकरणी बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

मनपातील आस्थापना दोन कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज उपायुक्त रवींद्र निकम यांनी व्यक्त केला आहे, तर संचिका जाणीवपूर्वक जाळण्यात आल्याचा आरोप पाच नगरसेवकांनी आज स्थायी समितीच्या सभेत केला. या प्रकरणाची महिनाभरात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. आस्थापना दोन विभागात पंख्याखाली संचिकांचे 14 गठ्ठे ठेवण्यात आले होते. सहा गठ्ठे टेबलावर होते. रात्री फॅन सुरू होता. शॉट सर्किट झाल्याने आगीचा लोळ जमिनीवरील आठ गठ्ठय़ांवर पडला. यामुळे आग लागून 1124 कर्मचार्‍यांच्या नोकर भरतीच्या संचिका आणि सेवापुस्तिका जळाल्या. फायली जळाल्या असल्या तरी सर्व डाटा संगणकावर सुरक्षित आहे, असा दावा आस्थापना अधिकारी सी. एम. अभंग यांनी केला आहे. याबाबत सुरक्षा अधिकारी अरविंद कुलकर्णी म्हणाले की, साडेसात वाजता साफसफाई करणार्‍या महिलेला काहीतरी जळाल्याचा वास आला. त्या महिलेने सुरक्षारक्षकांना याबाबत माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी अधिकार्‍यांना फ ोन करून सांगितले. सकाळी आठ वाजता फायर ब्रिगेडची गाडी आली आणि आग विझवण्यात आली. दरम्यान, खासदार चंद्रकांत खैरे यांनी मनपा कार्यालयात जाऊन आगीची पाहणी केली.

जळालेले दस्तऐवज
भरती झालेल्या चतुर्थर्शेणी कर्मचार्‍यांच्या शाळेचा दाखला, भरती कायमस्वरूपी करण्याचा न्यायालयीन आदेश, वयाचा दाखला, शिफारसपत्र, अनुभव प्रमाणपत्र.

निलंबित कर्मचारी
आस्थापना अधिकारी सी. एम. अभंग, चार सुरक्षारक्षक (चौघांचीही नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.)

स्थायी समितीच्या सभेत कोण काय म्हणाले?

>नोकर भरती प्रकरणात मोठा घोटाळा झालेला आहे. हा घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी आग लावण्यात आली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना निवेदन सादर करणार आहे.
-डॉ. जफर खान, विरोधी पक्षनेते.

>सर्व संचिका नोकर भरतीसंदर्भात होत्या. त्यात काही सेवापुस्तिकांचाही समावेश आहे. लागलेली आग संशयास्पद आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी. मंत्रालयात आग लागल्यानंतर आग विझवण्याचे साहित्य बसवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्या दिशेने कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. नगररचना, लेखा, भंडार विभाग तसेच टाऊन हॉल येथील संचिका असुरक्षित आहेत.
-गिरजाराम हाळनोर, शिवसेना नगरसेवक.

>आगीची घटना गंभीर असून याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. या प्रकरणाची एका महिन्याच्या आत निवृत्त न्यायधीशामार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. फायर सेफ्टीच्या दृष्टीने दक्ष असणे गरजेचे आहे.
-समीर राजूरकर, अपक्ष नगरसेवक.

>संचिकांना आग जाणीवपूर्वक लावण्यात आली आहे. शॉर्ट सर्किट झाले हे प्रशासन कशाच्या आधारावर सांगत आहे हेच समजत नाही. आग नेमकी कधी लागली याबाबत संभ्रम कायम आहे. नोकर भरतीच्या संचिकासोबत अनुकंपा कर्मचार्‍यांच्या नोकर भरतीतील फायलींचा समावेश आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.
-राजू वैद्य, शिवसेना नगरसेवक.

>या प्रकरणात उपायुक्तापासून लिपिकापर्यंतचे कर्मचारी गुंतलेले आहेत. यामुळे हे रेकॉर्ड जाळण्यात आले. या भरतीत प्रचंड घोटाळा झाला आहे. पैसे घेऊन भरती करण्यात आली. उमेदवारांनीही खोट्या कागदपत्रांआधारे नोकरी मिळवली. या प्रकरणाची चौकशी सुरूच होती. त्यामुळे या फायली जाळण्यात आल्या. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
-संजय केणेकर, गटनेता, भाजपा.

>ही घटना गंभीर असून एका महिन्याचा आत निवृत्त न्यायधीशामार्फत चौकशी करण्यात येईल. या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांना कुठल्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही.
-विकास जैन, सभापती, स्थायी समिती.

>सकाळी 8.30 वाजता आग लागल्याचे अभंग यांच्याकडून कळाले. शॉर्ट सर्किटमुळे 1124 संचिका अर्धवट जळाल्या आहेत. यात काही सेवापुस्तिकांचा समावेश आहे. टेबलवरील संचिका सुरक्षित आहेत. संचिकांतील सर्व डाटा संगणकावर सुरक्षित आहे. आग कमी प्रमाणात लागल्याने इतर संचिका सुरक्षित आहेत.
-रवींद्र निकम, उपायुक्त (प्रशासन)

>आग लागल्याचे कळाल्यानंतर 8.45 वाजता आग विझवण्यात आली. शॉर्ट सर्किट झाले असते तर विद्युत वाहिन्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असते. यामुळे ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाली नसल्याचे मला वाटत आहे.
-शिवाजी झनझन, उपायुक्त.

>मी मुंबईला आहे. दुपारी या प्रकरणाची सर्व माहिती मिळाली. या प्रकरणातील आस्थापना अधिकारी, सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे सांगण्यात आले असले तरी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करू. आग विझवण्याचे साहित्य बसवण्याचे सांगितले होते, पण सध्या किती साहित्य आहे याबाबत मला सांगता येणार नाही.
-डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त, मनपा