औरंगाबाद - शेंद्रा औद्योगिक वसाहतीत 13 मेगावॅट विद्युतनिर्मिती करणाºया ग्रीन एनर्जी लिमिटेड या कारखान्याला रविवारी (22 जून) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे चार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा व्यवस्थापक श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. उपअग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी मात्र आगीतील नुकसानीचा नेमका आकडा आताच सांगणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. लोखंडी पट्ट्यांच्या घर्षणातून ही आग लागली असावी, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
उसाचे चिपाड, सोयाबीन, कपास आदी कृषी बगॅसपासून विद्युतनिर्मिती करणार्या कारखान्याची सुरुवात शेंद्र्यात 2008 मध्ये करण्यात आली. रविवारी दुपारी साडेबारा वाजता ‘बगॅस’ बॉयलरपर्यंत घेऊन जणार्या ट्रॉलीच्या पट्ट्यांवर आग लागल्याचे कामगारांनी बघितले. त्यानंतर औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन विभागाला तातडीने ही महिती देण्यात आली. मात्र, सोसाट्याच्या वाºयामुळे पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. पुढील पंधरा मिनिटांत उपअग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्यासह जवान घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी शिंदे यांना सांगून कच्चा माल बुलडोझरद्वारे दूर लोटण्यास सांगितले. त्यानुसार जवळपास अर्धा तास आगीच्या भक्षस्थानी असलेला बगॅस आणि उर्वरित साठा वेगळा करण्याचे काम सुरू होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा सुरू होता, तरीही आग आटोक्यात येत नव्हती. एस. एम. शकील आणि एस. के . भगत यांचे पथकही आग आटोक्यात आणण्यासाठी आले. अग्निशमनचे तीन बंब आणि सहा पाणी टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या कारखान्यात कामगारांसह एकूण 50 जण कार्यरत असून आगीत जीवित हानी झाली नसल्याचे शिंदे यांनी म्हटले. अब्दुल अजीज, मोहन मुंगशे, सोमनाथ भोसले, कृष्णा होळंवे अग्निशमनचे आदी जवान घटनास्थळावर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज कारखान्यातील सुरक्षा रक्षकांनी वर्तवला. शॉर्टसर्किट नव्हे, तर लोखंडाच्या घर्षणामुळे आग लागल्याचे सुरे यांनी स्पष्ट केले असून सोमवारी दुपारपर्यंत आग पूर्णत: आटोक्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
चार कोटींच्या नुकसानीचा अंदाज
ट्रॉलीवरील पट्टा, केबलसह बगॅसचे एकूण 4 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, अद्याप असेसमेंट झाले नसल्यामुळे अंदाज वर्तवणे कठीण असल्याचे अग्निशमन अधिकारी सुरे यांनी सांगितले. साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल बगॅस खरेदी केलेले होते, असे कंपनीच्या व्यवस्थापनाने सुरे यांना सांगितले. त्यामुळे किती बगॅस जळाला हे स्पष्ट झाल्यानंतर नुकसानीचा आकडा कळणार आहे.