आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire Take Place In Candale Factory In Shendra, Fire Under Control Late Night

मेणाच्या कारखान्याला शेंद्र्यात भीषण आग,रात्री उशिरा आग विझवण्‍यात यश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेंद्रा एमआयडीसी परिसरातील बँकी इंटरनॅशनल कंपनीच्या मेणबत्ती कारखान्यात शक्तिशाली स्फोटानंतर भीषण आग लागली. सुमारे एक हजार चौरस फूट क्षेत्रफळात असलेल्या या कारखान्याला लागलेली ही आग एवढी भीषण होती की, धुराच्या भव्य लोटांसह अक्राळविक्राळ ज्वाळा सात हजार मीटर उंचीवर पोहोचल्या होत्या. सुमारे 40 किमी अंतरावरूनही धुराचे लोट दिसत होते. गुरुवारी दुपारी 3.10 वाजता लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन जवानांना 5 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. रात्री 10 वाजेपर्यंत आग धुमसतच होती. रात्री उशिरा ती विझवण्यात आली.
या भीषण आगीत जीवित हानी झाली नाही. मात्र, कारखान्यातील कच्चे मेण, संपूर्ण इमारत आणि यंत्रसामग्रीची राखरांगोळी झाली. प्राथमिक पाहणीत सुमारे अडीच कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता कंपनीचे मालक प्रतीक सेठिया यांनी सांगितले.
सात महिन्यांपूर्वीच सुरू झाला कारखाना : शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ‘स्कोडा’च्या शेजारी सहा-सात महिन्यांपूर्वी
बँकी इंटरनॅशनलचा मेण प्रक्रियेचा कारखाना सुरू करण्यात आला. आज दुपारी अडीचच्या सुमारास कारखान्यात दहा कामगार व स्वत: सेठिया होते. ते एका कोप-यात दुपारच्या जेवणासाठी बसले. दुपारी 3.10 वाजता अचानक कारखान्यात शक्तिशाली स्फोट झाल्याचा आवाज कामगारांनी ऐकला. लगेच आगीच्या भीषण ज्वाळा बाहेर पडल्या. तत्क्षणी कामगार जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पाहता पाहता संपूर्ण कारखाना ज्वाळांनी कवेत घेतला. आकाशात मीटर उंचीवर धुराचे लोट दिसू लागले. कामगारांचे कपडे आणि एक दुचाकी त्यात जळाली. सुमारे पस्तीस मिनिटांनी महापालिका व एमआयडीसी अग्निशमन दलाचे बंब पोहोचले. 17 जवानांनी पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कच्चे मेण, यंत्रसामग्री आणि इमारत जळाली होती. कारखान्याची पंधरा फूट उंच इमारत भुईसपाट झाली. प्राथमिक अंदाजानुसार अडीच कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. या वेळी घटनास्थळी शेकडो नागरिकांनी गर्र्दी केली होती.
करमाड, चिकलठाणा पोलिसांचा चोख बंदोबस्त
करमाड व चिकलठाणा हद्दीत हा कारखाना येत असल्याने दोन्ही ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या फौजफाट्यासह सुरक्षेसाठी तैनात होते.
एक हजार लिटर लिक्विड फोमच मारा
आग विझवण्यासाठी जवळपास 17 जवानांनी परिश्रम घेतले. पाच गाड्या, पाण्याचे टँकर, एक हजार लिटर लिक्विड फोमचा मारा करून ही आग विझविली.
आर. के. सुरे, उपअग्निशमन अधिकारी, मनपा.
मोठा अनर्थ टळला
स्कोडा, वॉटर कंपनीच्या जवळच मेणबत्ती कारखाना आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
डॉ. दिलावर बेग, नागरिक
माझी दुचाकी जळाली
आम्ही सर्वजण दुपारी तीन वाजता कारखान्याच्या एका कोप-यात जेवावयास बसलो. तेव्हा स्फोटासारखा आवाज झाला आणि आगीचे लोळ उठले. आम्ही घाबरून कारखान्याबाहेर पडलो. यात आमचे कपडे आणि माझी हीरो होंडाची स्प्लेंडर दुचाकी जळाली.
अरुण खाडे, कामगार
सात हजार मीटर उंच लोट
भीषण आगीमुळे प्रचंड धूर निघत होता. जमिनीपासून 7 हजार मीटर उंचीवर धुराचे महाकाय ढग दिसत होते. हवेत मेणमिश्रित रसायन मिसळल्याने परिसरात उग्र दर्प सुटला होता.