आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गोळ्या झाडल्या; एक हातात, एक पायात! जमिनीच्या वादातून घडला प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - नागापूर शिवारात रविवारी सकाळी ११.३० वाजता गोळीबार झाला. यात साजेद ऊर्फ सज्जू शब्बीर कुरेशी (२५, रा. शेंदुरवादा) याच्या हातात एक, तर पायात दुसरी गोळी घुसली. गोळी झाडणाऱ्या रऊफ पटेल (४५, रा. खंडोबाचे सातारा) आणि त्यांच्या वाहनाचा चालक शेख अब्दुल शेख अब्बास (५०) यांना लोकांनी बेदम मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असला तरी उभ्या पिकामध्ये बकऱ्या घुसल्याचे निमित्त करून रऊफ यांनी गोळीबार केल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाळूजपासून जवळपास १५ कि.मी., तर शेंदुरवादापासून एक कि.मी. अंतरावर नागापूर शिवार आहे. येथील गट क्रमांक २० मध्ये रऊफ पटेल यांची २२ एकर शेती आहे. ते जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या शेतात सध्या हरभऱ्याचे पीक आहे. यात बकऱ्या घुसल्याने चिडून रऊफ यांनी गोळीबार केला. वास्तविक पाहता गोळीबारामागे जमिनीचा वाद प्रमुख असल्याचे परिसरात बोलले जाते. दरम्यान, गोळीबारामुळे परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली होती.
जमिनीचा वाद; नागापूर शिवारातील गोळीबारात एक जखमी
जावेद माजिद कुरेशी आणि साजेद शब्बीर कुरेशी यांचे नातेवाइक रऊफ यांच्यात जमिनीवरून वाद आहे. अडीच वर्षांपूर्वी हा वाद पोलिसांमध्ये गेला होता. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. रविवारी बकऱ्या घुसल्याचे निमित्त झाले आणि रऊफ यांनी याचा वचपा काढण्यासाठी गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. वाळूज पोलिसांनी मात्र बकऱ्या चारल्यावरून वाद झाल्याची तक्रार नोंदवली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नेमके काय झाले? : जावेदमाजिद कुरेशी यांच्या बकऱ्या गावातील एका अल्पवयीन मुलाकडे चारण्यासाठी दिल्या आहेत. रविवारी ११.३० वाजता बकऱ्या रऊफ यांच्या शेतात गेल्या. त्याच वेळी रऊफ सफारीमध्ये (एमएच २० डीजे २९२) तेथे दाखल झाले. बकऱ्या गेल्याचे पाहून त्यांनी त्या मुलाकडे जाब विचारला. याची माहिती कळाल्यावर जावेद कुरेशी तेथे आले. त्यानंतर रऊफ जावेद कुरेशी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे रऊफ यांना राग आला. त्याच वेळी साजेद ऊर्फ सज्जू कुरेशी शेजारून जात होता. तोसुद्धा आपल्याशी वाद घालण्यासाठी येत असल्याचा समज झाल्याने रऊफ यांनी पिस्तूल काढून हवेत नंतर साजेदच्या दिशेने दोनदा गोळ्या झाडल्या.
शेंदुरवाद्यात दर रविवारी बाजार भरतो. घटनास्थळापासून बाजार एक कि.मी. अंतरावर आहे. गोळीबाराचा आवाज बाजारातील लोकांनी ऐकला आणि त्या दिशेने अनेक जण धावले. जखमी कुरेशींचे नातेवाईकही तेथे आले. सगळ्यांनी मिळून रऊफ पटेल वाहनचालक अब्दुल शेख यांना बेदम चोप दिला. यात रऊफ पटेल यांचे डोके तोंड फुटले. छावणी परिमंडळ विभागाचे सहायक पोलिस आयुक्त रामराव हाके, पोलिस निरीक्षक अशोक कदम, घटनास्थळी आले. तत्पूर्वी साजेदच्या नातेवाइकांनी त्याला पोलिसांनी रऊफ आणि अब्दुल शेख यांनाही घाटीत नेले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाळूज पोलिसांनी याप्रकरणी सफारी कारसह एकाला ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली असून रऊफ पटेल यांच्याकडील परवाना असलेले पिस्तूल ताब्यात घेण्यात आले.