आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात पालिकेची पहिली आयएसओ मानांकन शाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- आयएसओच्या मानांकनासाठी नगरपलिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या शहरांतील सर्व १९ शाळांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेसह शाळांच्या मुख्याध्यापकांनी कंबर कसली आहे. मराठवाड्यात वैजापूर नगरपालिका वगळता अन्य ठिकाणी वेगवेगळ्या संस्थेच्या शाळा आहेत. वैजापूरलाच प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन नगरपालिकेकडे आहे. दरम्यान, वैजापूर ग्रामीण एक या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या नगरपालिकेच्या स्वर्गीय सुंदरबाई गायकवाड फुलेवाडी प्राथमिक शाळेने आयएसओचे सर्व निकष पूर्ण केले असून लवकरच ही शाळा मानांकनाने सन्मानित होणार आहे. ही राज्यातील नगरपालिकेतील पहिली आयएसओ शाळा ठरणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या व्यापारीकरणामुळे सरकारी शाळेबद्दल नागरिकांत कमालीचे गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे सरकारी शाळा गुणवत्ता असूनही मागे पडू लागल्या आहेत. काही शाळा वगळता अन्य ठिकाणी शिक्षकांनी आपले कौशल्य पणाला लावून आदर्श पिढी घडवण्याचे काम अखंड सुरू ठेवले आहे. कालानुरूप शैक्षणिक क्षेत्रात बदल होत असल्याने त्या स्पर्धेत टिकाव लावण्यासाठी पालिका प्रशासनानेही आता उडी घेतली आहे. नगरपालिका फंडातून शहरातील सर्व शाळा आयएसओ दर्जाची करण्यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. यासाठी पालिका प्रशासनाने ५० हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली असून उर्वरित निधी हा लोकसहभागातून उभा करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत पालिकेच्या सर्व शाळांचा आयएसओ मानाकंन प्रणालीतून चेहरामोहरा बदलण्याची खूणगाठ पलिकेने बांधली आहे.
मराठवाड्यात नागरी भागात एकमेव अशी वैजापूरची नगरपलिका प्रशासनाच्या अखत्यारीत पहिली ते सातवीपर्यंत मराठी माध्यमाच्या १९ शाळा आहेत. या शाळांतून नागरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याचे मौलिक कार्य होत आहे. शिक्षणाचा प्रवाह अधिक बळकट करण्यासाठी या सर्व शाळांना स्वत:ची स्वतंत्र प्रशस्त इमारत, शिक्षकांचे संख्याबळ तसेच शाळास्तरावर गुणवत्ता टिकवण्याबरोबरच शालेय शिक्षणाला चालना देण्याचे काम पोषक वातावरण येथे पलिकेने उभे केलेले आहे. नगरपालिकेच्या शाळांनी आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. खासगी शाळेच्या तुलनेत नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी सरस ठरल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. दरम्यान, प्रशासनाने शाळा आयएसओ करण्याचा विडा उचलला खरा, मात्र या शाळांकरिता आवश्यक असलेल्या अन्य काही भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात मात्र स्थानिकांची उदासीनता आडवी येत असल्याचे दिसून येत आहे.
फुलेवाडीची शाळा आयएसओ
दरम्यान, नगरपालिकेची वैजापूर ग्रामीण एकच्या हद्दीतील फुलेवाडी परिसरातील स्वर्गीय सुंदरबाई गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ सोमासे यांनी मागील वर्षभरापूर्वी शाळा आयएसओ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. आयएसओचे महत्त्व त्यांना पटल्याने त्यांनी पालिका प्रशासनासह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचे रूप पालटवले. मुख्याधिकारी भागवत बिघोत, जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर गायकवाड, फकिरा गायकवाड व शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक मनीष गणवीर यांच्या मदतीमुळे या शाळेने हा टप्पा गाठण्यात यश मिळवले आहे. तसेच शहरातील पाटील गल्लीतील श्री स्वामी समर्थ शाळेची त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. लोकसहभागातून परिसराचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
शाळानिहाय ५० हजारांचा निधी
पालिकेच्या शहरातील १९ शाळांना आयएसओ मानाकंनाचे लूक बहाल करण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे १० लाखांच्या निधीला नगरसेवकांनी मंजुरी दिली आहे, तर उर्वरित निधीची जुळवाजुळव लोकसहभागातून केली जाणार आहे. यामुळे लवकरच शहरातील सर्व शाळा आयएसओ मानांकित झाल्याचे दिसून येणार आहे. बी. यू. बिघोत, मुख्याधिकारी