आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराई येथे जिल्ह्यातील पहिले मॉडेल स्कूल !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिक्षक सेनेने विद्यार्थी-शिक्षकाचे नाते आणखी घट्ट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शिवराई येथे जिल्ह्यातील पहिले मॉडेल स्कूल निर्माण करण्याचा संकल्प शिक्षक सेनेने केला आहे. जिल्हा परिषदेच्या २२०० शाळांपैकी ४० शाळांमध्ये शिक्षक सेनेच्या वतीने व्हर्च्युअल क्लासरूम संकल्पना राबवली जात अाहे. त्यात जि. प. वतीने १२८ शाळा आयएसओ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शिवराई येथील जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्नप्रमाणे इंग्रजीमधून आॅनलाइन शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सर्व शाळांच्या भिंती आतून आणि बाहेरून बोलक्या करण्यात येत आहेत. ज्याप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतात, तसेच रुपडे या शाळेला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे अंतर्गत आणि बाह्य भाग डिजिटल असल्याची जाणीव होईल. विद्यार्थ्यांना अॅनिमेशनच्या माध्यमातून शिकवले जाणार आहे.
गावकऱ्यांनी पुढाकार घेत वर्गणीद्वारे जमा केले पैसे
खर्च व्यवस्था : या शाळेसाठी शिक्षक सेनेसह गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्याने ही शाळा मॉडेल स्कूल म्हणून उदयास येत आहे. यासाठी लागणारा तीन लाख रुपयांचा खर्च गावकऱ्यांनी वर्गणीद्वारे जमा केला आहे. शिक्षण विभागाकडूनही सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.

विद्यार्थ्यांना फायदा
दहावीपर्यंतच्या शिक्षणाची विद्यार्थ्यांना सातवीत शिकतानाच ओळख होणार आहे. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून शिकवले जाणार असल्याने सातवीनंतरच्या अभ्यासक्रमाची अगोदरच तोंडओळख होते. इंटरनेट, संगणक, एलसीडी शिक्षण आणि इतर अभ्यास त्यांचा आधीच पूर्ण होतो.

मुंबईमुळे सुचला उपक्रम

^मुंबईला कार्यक्रमासाठी गेलो असता महानगरपालिकेच्या शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम उपक्रम बघितला होता. त्यामुळे अापल्याकडे ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यापुढे जाऊन मॉडेल स्कूल ही संकल्पना लक्षात आली. दिपक पवार, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना

शाळेत करण्यात आले बदल
या स्कूलमध्ये सर्व शालेय परिसर बोलका करण्यात आला आहे. मुलांसाठी सर्व सोयींनी युक्त असे खेळाचे मैदान तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर आधुनिक बैठक व्यवस्था, कौशल्यावर आधारित शिक्षण, पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था, शारीरिक शिक्षण, संगीत शिक्षण तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीतून अतिरिक्त सुविधा देण्याचे काम केले जाणार आहे.