आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत ‘पाझर’ एकांकिकेला प्रथम पारितोषिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रातील मानाच्या असलेल्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘पाझर’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ५२ वर्षांनंतर मराठवाड्यात पुरुषोत्तम करंडक खेचून आणण्याचे काम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शन विद्यार्थी प्रवीण पाटेकर यांनी केले आहे.
महाअंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट सांघिक प्रथम पारितोषिक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रवीण पाटेकर तसेच सर्वात्कृष्ट अभिनय नैपुण्य शुभम खरे जगदीश जाधव यालाही अभिनयाचे पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. एकांकिकेत काम करणारे कलावंत - लेखक -प्रवीण पाटेकर, दिग्दर्शक - प्रवीण पाटेकर भूमिका - जिजा - शुभम खरे, सुदाम-जगदीश जाधव, गोरक्षा -प्रशांत गिते, रंगा-गणेश मुंडे, बंड्या-आकाश थोरात, ताला-प्रमोद तांबे, बबड्या-धीरज शिरसाट तसेच तांत्रिक कलावंत प्रकाशयोजना- चेतन ढवळे, संगीत-अर्जुन टाकरस, प्रवीण पारधे, सुनील वणवे, वेशभूषा-रंगभूषा- सुनील वणवे, नैपण्य-प्रवीण पारधे, भागेश सांळुंके यांना आदेश बांदेकर, राजीव खांडेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर, डॉ. जयंत शेवतेकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

‘पाझर’ ही एकांकिका ग्रामीण भागातील जीवनावर भाष्य करणारी आहे. त्यामध्ये पाण्यामुळे गावातील माणसे शासनाच्या छावणीवर धाव घेऊ लागले. संपूर्ण गाव ओसाट पडण्याच्या मार्गावर असल्याने एका वृद्ध व्यक्तीने पाण्याचा प्रश्न कायम सुटावा यासाठी त्याने सगळ्या लोकांना एकत्र आणून आड खोदण्यासाठी प्रेरित केले. यामध्ये अंधश्रद्धेला मानणाऱ्या भोंदू माणसामुळे होणारी शोकांतिका दर्शविते तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीचा निसर्गाविरुद्ध चाललेला संघर्ष प्रवीण पाटेकर यांनी लेखनाद्वारे मांडला. यामध्ये सर्वधर्म समभाव संदेश देण्यात आला असून पाण्यासाठी कशी सर्व जातीची माणसे एकत्र येतात याचे जिवंत उदाहरण ‘पाझर’ एकांकिकेतून दर्शविण्यात आले आहे. ही एकांकिका ग्रामीण भागातील प्रत्येकाला प्रेरित करते जगण्याची नवी उमेद देते, असे पाटेकर यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...