आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैजापुरात आज तालुकास्तरीय पहिलाच मराठा क्रांती मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील डेपो रोडवरील संभाजी महाराज चौकातून विराट मराठा क्रांती मूकमोर्चा निघणार आहे. दरम्यान, पोलिस दलाने कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
मूकमोर्चा यशस्वितेसाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. जिल्हास्तरावर पार पडलेल्या विशाल गर्दीच्या मराठा क्रांती मूकमोर्चानंतर तालुका पातळीवर पहिला न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी येथील संयोजकांनी लाखो जनसमुदायाच्या लक्षणीय उपस्थितीत विशाल मोर्चा काढण्याचे नियोजन आखले आहे.
या प्रमुख मागण्यांसाठी निघणार मोर्चा : नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेसह महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा दया, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी कायदा दुरुस्ती करा, मराठा समाजाला आरक्षण व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ईबीसी उत्पन्न मर्यादा ६ लाख करावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती व शेतमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी भाव मिळाला पाहिजे या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.

शिस्तबद्ध नियोजनात मोर्चा पार पडेल : तालुका पातळीवर १३ ऑक्टोबर रोजी सकल मराठा क्रांती मूकमोर्चात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनी, महिला, डॉक्टर, वकील, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मोर्चात प्रशासनाला पाच मुलींच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येईल.
पोलिस प्रशासन सतर्क...
पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनीही वैजापूर दौऱ्यात मोर्चातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पोलिसांची मोठी कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली २ उपविभागीय पोलिस अधिकारी, ७ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक १९,पोलिस कॉन्स्टेबल २११, महिला पोलिस ५०, वाहतूक शाखेचे १५ कर्मचारी, दंगा काबू पथकाच्या ३ तुकड्या, वॉकीटॉकी पथकाचे २३ असा जम्बो फौजफाटा मोर्चासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी दिली. दरम्यान, शहरातील सर्व मार्गांवरील वाहतूक सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
मोर्चावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर
मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, महिला सहभागी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संयोजकांनी जागोजागी वाहने उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था केली आहे. मोर्चाच्या हालचाली टिपण्यासाठी दोन ड्रोन कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
गंगापुरात २५ रोजी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन
गंगापूर - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्यात यावे, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी २५ आॅक्टोबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या वतीने येथील शिवकृपा मंगल कार्यालयात दि. १२ रोजी समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवर व हजारोंच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आमठाणा, पिंपळदरीत बैठका
सिल्लोड तालुक्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी आमठाणा व पिंपळदरी येथे नियोजन पुर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...