आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिडकीन डीएमआयसीचे पहिले टेंडर 1300 कोटींचे, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कामाला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेंद्रा डीएमआयसीमधील पायाभूत सुविधांची कामे ४० टक्के पूर्ण होत आहेत. त्यामुळे बिडकीन डीएमआयसीच्या कामांना जून महिन्यापासून सुरुवात होणार आहे. आठ दिवसांपूर्वीच १३०० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामाच्या ऑनलाइन निविदा निघाल्या अाहेत. एल अँड टी, शापूरजी पालनजी, कर्नाटक कन्स्ट्रक्शन्स या देशातील मोठ्या उद्योगांनी निविदा दाखल केल्या आहेत, अशी माहिती ऑरिक सिटीचे महाव्यवस्थापक गजानन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या डीएमआयसी प्रकल्पाला आता बऱ्यापैकी वेग आला आहे. शेंद्र्यापेक्षाही बिडकीन भागात या प्रकल्पाचे काम होण्याकडे स्थानिक उद्योजकांचे लक्ष लागले आहे. तेथे उद्योग सुरू करण्याकडे स्थानिकांचा अधिक कल आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सांगितले की, बिडकीन येथील जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून तेथील पहिल्या टप्प्याच्या कामांना जून महिन्यातच सुरुवात होईल. तेथील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा भरण्याची शेवटची तारीख २२ मेपर्यंत आहे. निविदा ऑनलाइन भरावयाच्या आहेत. पहिल्या टप्प्यात ८०० हेक्टरपैकी १०० हेक्टर जमिनीवर पायाभूत सुविधांची कामे सुरू होतील. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल, असा दावाही त्यांनी केला. 

सीसीटीव्ही कॅमेरा अन् स्काडा सिस्टिम 
बिडकीन येथेही शेंद्रा डीएमआयसीप्रमाणे सर्व कामे जागतिक दर्जाचीच होतील. त्यात सर्वत्र सीसीटीव्ही लावलेले असतील. पाणीपुरवठा यंत्रणेसाठी दक्षिण कोरियात विकसित झालेल्या स्काडा प्रणालीची मदत घेतली जाणार आहे. ही ऑनलाइन प्रणाली असून त्यात संपूर्ण बिडकीन डीएमआयसीमधील जलकुंभांचे नियंत्रण एकाच खोलीतून होणार आहे. एखाद्या जलकुंभात कमी आणि दुसऱ्यात अधिक पाणी असेल तर ते स्वयंचलित यंत्रणेद्वारे नियंत्रित केले जाणार आहे. 

चोवीस तास पाणी आणि वीज 
शेंद्र्याप्रमाणेबिडकीन डीएमआयसीमध्ये चोवीस तास वीज, पाणी आदी सुविधा राहणार आहेत. महावितरण कंपनी तेथे वीज उपकेंद्र उभारणार आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व कामे २०२० पर्यंत पूर्ण होतील, असेही पाटील यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...