आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारविरुद्ध काँग्रेस प्रथमच रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातकायम सत्तेवर राहिलेली काँग्रेस १९९५ ते ९९ ही साडेचार वर्षे आता गेल्या महिन्यांपासून विरोधी बाकावर आहे. विरोधी बाकावर बसल्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस प्रथमच रस्त्यावर उतरली. शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेस म्हणजे ग्रामीण चेहरे असे चित्र या वेळी दिसले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोर्चाला दोन हजार एवढी गर्दी होती.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, भूसंपादन कायदा रद्द करणे यासह वेगवेगळ्या मागण्या या वेळी पुढे करण्यात आल्या. आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, माजी आमदार एम. एम. शेख, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, माजी आमदार नामदेव पवार आदी मंडळी या वेळी उपस्थित होती.

सकाळी ११ वाजता मोर्चा निघणार असे ठरले होते. विशेष म्हणजे वेळेत मोर्चेकरी हजर झाले होते, परंतु चव्हाण यांना नांदेडहून येण्यास विलंब झाल्याने सर्वजण ताटकळले. साडेबारा वाजता चव्हाण आले. शहागंज येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरू होणार, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार चव्हाण तेथे गेले, परंतु त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला नाही. ते खालीच थांबले. प्रवक्ते सचिन सावंत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हे सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर कार्यकर्त्यांसाठी आणण्यात आलेल्या पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या सर्वांनाच घालण्यात येत होत्या. ती चव्हाण यांना डोक्यात घालण्याचा एकाने प्रयत्न केला, परंतु चव्हाण यांनी काँग्रेसची टोपी नाकारली. मोर्चा संपेपर्यंत त्यांनी टोपी घातली नाही.

काँग्रेसला दलितांच्या अॅलर्जीचा आरोप
मोर्चासाठीतयार करण्यात आलेले पोस्टर्स तसेच बॅनर्सवर एकही दलित नेता तसेच कार्यकर्त्याचा फोटो नव्हता. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जातानाही दलितांना डावलण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांनी केला. औताडे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून हा भेदभाव होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धी करण्यात येत होती. त्यावर एकही दलित नेता किंवा कार्यकर्त्याला स्थान देण्यात आले नाही. आजही त्यांना दूरच ठेवण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतानाही हाच भेदभाव होता. भाऊसाहेब ठोंबरे जिल्हाध्यक्ष असताना असा भेदभाव केला जात नव्हता. औताडे हे मुद्दाम करत असल्याचेही पारखे यांनी सांगितले. या प्रकरणी आपण चव्हाण यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.