आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑटो क्लस्टर’ची उभारणी; मराठवाड्याला शासनाने दिले पाच कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/औरंगाबाद- केंद्र सरकारच्या औद्योगिक, पायाभूत सुविधा श्रेणी वाढ योजनेनुसार औरंगाबादेतील मराठवाडा ऑटो क्लस्टर प्रकल्पासाठी शासनाने मंगळवारी पाच कोटींचा धनादेश दिला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या उद्योजकांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. मराठवाड्याच्या विकासाचा आराखडा तयार होत असून येत्या काही महिन्यांत त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुनगंटीवार म्हणाले, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांसह मी ३ जुलै रोजी औरंगाबादला भेट दिली. तेथे तयार झालेल्या क्लस्टरसाठी ५ कोटींची मदत देऊ, असे आम्ही जाहीर केले होते. मराठवाडा दुष्काळाने त्रस्त आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राव्यतिरिक्त असलेल्या उद्योगांद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याची तेथे आवश्यकता आहे.

यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, वित्त सचिव (वित्तीय सुधारणा) विजयकुमार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी आणि औरंगाबाद येथील उद्योजक उपस्थित होते.

शब्द पाळला
ऑटो क्लस्टरसाठी तेव्हा अजित पवार यांनी आश्वासन देऊनही पाळले नव्हते. मुनगंटीवार यांनी शब्द पाळला. आता इलेक्ट्रॉनिक क्लस्टरला जागा द्यायला हवी.
- राम भोगले, अध्यक्ष, ऑटो क्लस्टर