आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ‘फाइव्ह डेज वीक’ कन्सेप्ट रुजण्यास सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील आयटी इंडस्ट्रीमध्ये ‘फाइव्ह डेज वीक’सह अनेक नवे ट्रेंड येत आहेत. मोठ्या ऑटोमोबाइल कंपन्या, मल्टिनॅशनल फार्मा कंपन्या व सीड्स कंपन्यांच्या ‘आर अँड डी’मध्येही हा ट्रेंड दिसून येत आहे. कामाचा ताण कमी व्हावा तसेच दैनंदिन जीवन आणि कामाचा योग्य समतोल साधता यावा, या उद्देशाने महानगरांमध्ये रुळलेला हा ट्रेंड शहरातही दाखल होत असल्याचे चित्र आहे.
आयटी कंपन्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. एका आयटी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत देशपांडे म्हणाले, आमच्या क्षेत्रात आठवडा पाच दिवसांचा झाला आहेच; शिवाय कामाच्या वेळाही खूप लवचीक आहेत. घरून किंवा आहे तिथून लॅपटॉपवरून काम करणे, रिपोर्टिंग करणे, मेलला उत्तर देणे, संपर्कात राहणे असे बहुतांश काम होत आहे. त्यामुळे आॅफिसचे इन्फ्रास्ट्रक्चर, जागा, फर्निचर, विजेचा खर्च, अधिकचे मनुष्यबळ अशा अनेक गोष्टींना फाटा मिळतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कार्यालयात येण्या-जाण्यात वाया जाणारा दोन-तीन तासांचा वेळ तसेच पैसा आणि एनर्जीही वाचते. अर्थात, औरंगाबादेतील आयटी कंपन्यांमध्ये सर्व कामे घरून होत नाहीत; पण अडीअडचणीच्या वेळी व विशेषत: महिलांना ही सुविधा निश्चितपणे मिळत आहे. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महत्त्वाचा समजला जाणारा फॉर्मल ड्रेस कोडही आता राहिलेला नाही.
आयटीत ‘जनरेशन गॅप’ इतिहासजमा - इतर कोणत्याही क्षेत्रात वरिष्ठांना ‘सर’ किंवा ‘जी’ अशा शब्दांत संबोधले जाते. मात्र, आयटी इंडस्ट्रीमधील नवीन पिढी अधिकाधिक इन्फॉर्मल होत आहे. सरळसरळ पहिल्या नावाने हाक मारण्याची पद्धत या क्षेत्रात रूढ होत आहे. येथे सिनिअ‍ॅरिटीपेक्षा कॉन्ट्रीब्युशन, आऊटपुटला महत्त्व आहे. त्याअर्थाने आयटीमध्ये ‘जनरेशन गॅप’ इतिसाहसजमा होत असल्याचे देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.
ऑटो कंपन्यांत ट्रेंड - शहरातील स्कोडा कंपनीतील नॉन-प्रॉडक्शन विभागांमधील कर्मचाºयांना ‘फाइव्ह डेज वीक’ लागू झाला आहे. एकूण आॅटो इंडस्ट्रीचा विचार करता 50 ते 60 टक्के इंडस्ट्रीमध्ये हा कन्सेप्ट दिसून येतो. कामाचा ताण हलका करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस सुटी आवश्यक आहे. दुसºया देशांमध्ये सर्वच क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा असतो. भारतासारख्या विकसनशील देशाला प्रॉडक्शनसारख्या थेट उत्पादनाशी संबंधित क्षेत्राला आज तरी ‘फाइव्ह डेज’ शक्य नसल्याचे मत ‘स्कोडा’चे एचआर मॅनेजर मकरंद देशपांडे यांनी मांडले.
सुटीतही ‘कनेक्टेड’ - आठवड्याचे दोन दिवस सुटी मिळत असली तरी बहुतेकांना विशेषत: वरिष्ठ वर्गाला ‘कनेक्टेड’ राहावे लागते. आता मोबाइलमध्येच सर्व प्रकारचे ई-मेल, मेसेजेस पाहायला मिळत असल्याने सुटीच्या काळातही व्यक्ती कामात राहतात, अशी वस्तुस्थिती असल्याचे काहींनी सांगितले.
‘आर अँड डी’मध्येही सुरुवात - बहुतांश मल्टिनॅशनल फार्मा कंपन्या तसेच बियाणे कंपन्यांमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग असतो. या विभागात पाच दिवसांचा आठवडा सुरू झाला आहे. मात्र, आयटीतील वेळेची लवचीकता, घरून काम करण्याची सुविधा अशी कन्सेप्ट फार्मा किंवा सीड्स कंपन्यांमध्ये आली नसल्याचे एका रिसर्च असोसिएटने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.