आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच नवीन उपकेंद्रे, २५५ रोहित्रे बसवणार, सक्षमीकरणासाठी १११ कोटींचा निधी उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील वीज वितरण प्रणाली सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून १११ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. महिनाभरात विकासकामांना सुरुवात होणार असून यात नवीन सबस्टेशन उभारणे, २५५ रोहित्रे बसवणे, १७८ किमी भूमिगत आणि १८७ किमी एअरबंच केबल टाकण्यात येणार आहे. तीन लाख वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

शहर एक विभागात ड्रम प्रोजेक्टअंतर्गत बहुतांश ठिकाणी भूमिगत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र छावणी, पॉवर हाऊस, क्रांती चौक ते चिकलठाणा, हर्सूल, सातारा, बीड बायपास परिसरातील विद्युत खांब, वाहिन्या चाळीस वर्षांपूर्वीच्या आहेत. दोन खांबांमधील वाहिन्या जागोजागी तुटल्या आहेत. रोहित्राच्या क्षमतेपेक्षा कनेक्शन जास्त असल्याने दाब वाढून वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. वीजचोरीही वाढली असून गळतीचे प्रमाण ४२ ते ७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. महावितरणने १११ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. त्याला तातडीने मंजुरी मिळाली असून निधी प्राप्त झाला आहे. महिनाभरात विकासकामांना सुरुवात होईल, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.

हर्सूल, साताऱ्यात उपकेंद्र
चिकलठाणा,एमआयडीसी, दूध डेअरी, समाधान कॉलनी, एन-१० सिडको येथे नवीन उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. त्याशिवाय २५५ उच्च क्षमतेची रोहित्रे बसवण्यात येणार आहेत. सातारा, सावंगी, हर्सूल, एसटीआयपी येथेही उपकेंद्रे प्रस्तावित आहेत.

वीज गळती कमी होईल
विद्युतवाहिन्या जमिनीवर झुकल्या आहेत. वीज गळतीचे प्रमाण ४२ ते ७५ टक्क्यांवर गेले. ही बाब अतिशय गंभीर असून यावर मात करण्यासाठी तातडीने १७८ किमी भूमिगत वाहिनी तसेच १८७ किमी एअरबंच केबल टाकली जाणार आहे. यामुळे क्षेत्रातील वीज गळती थांबेल.