आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या शाळांत पाच-सातच विद्यार्थी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पटसंख्या ४०-५०, प्रत्यक्षात वर्गात पाच-सातच विद्यार्थी अशी अवस्था मनपाच्या काही शाळांची झाली असून अशा शाळांचे मनपाच्या इतर शाळांत एकत्रीकरण करण्याचा विचार मनपाने सुरू केला आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी काही शाळांना भेटी दिल्यावर विद्यार्थी संख्येचे वास्तव समोर आले आहे.

शहरात महापालिकेच्या ७७ शाळा असून काही मोजक्याच शाळांत विद्यार्थी संख्या चांगली आहे. मनपाच्या काही शाळांची कामगिरीही चांगली असली, तरी बहुतांश शाळांची परिस्थिती बिकटच असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी महापौर त्र्यंबक तुपे व उपायुक्त बी. एल. पवार यांनी
काही शाळांना भेटी दिल्यावर केविलवाणी स्थिती पाहायला मिळाली. पहिली ते चौथीच्या शाळांची अधिक वाईट अवस्था आहे.

हनुमाननगरच्या शाळेत ४७ पटसंख्या असताना अवघे सात विद्यार्थी आढळले, तर जयभवानीनगरात अवघे आठ विद्यार्थी होते. कैसर काॅलनीच्या शाळेत ३७ पैकी फक्त दोनच चिमुरडे बाराखडी गिरवायला आले होते. जिन्सीत ब-यापैकी म्हणजे ३०, जवाहर काॅलनीच्या शाळेत ४०, तर उस्मानपु-याच्या शाळेत ५० विद्यार्थी होते.

हेडमास्तर, शिक्षक एकच
एन-६ च्या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. तेथे आज पाचवी, सहावी व सातवीचे मिळून अवघे आठ विद्यार्थी होते. या सगळ्यांचा एकत्रित वर्ग हेडमास्तरांच्या समोर बसून सुरू होता.
कारण तेच हेडमास्तर व तेच शिक्षक होते. बाकी कुणी नाही. टीसी वगैरे कामे करत शिकवण्यात येत होते.

शाळा एकत्रीकरण करावे लागणार
याबाबत महापौर म्हणाले की, या शाळांसाठी चांगल्या इमारती आहेत, पण विद्यार्थीच नाहीत. अशा स्थितीत अशा काही शाळांचे लगतच्या भागातील मनपा शाळांत एकत्रीकरण करावे लागणार आहे. तरच या विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित होऊ शकेल व शिक्षकांची जेथे कमतरता आहे, अशा शाळांत येथील शिक्षक सामावून घेता येतील. याबाबत सर्व संबंधितांशी व पदाधिका-यांशी बोलूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

खासगी शाळांचा परिणाम
मनपाच्या कमी विद्यार्थ्यांच्या शाळा पाहताना जाणवलेली बाब म्हणजे काही ठिकाणी दहा ते पंधरा खासगी शाळा आहेत, तेथे विद्यार्थ्यांची संख्या तुडुंब आहे. या खासगी शाळा मार्केटिंग करून विद्यार्थी जमवतात. मनपाला ते शक्य नाही. शिवाय मनपाच्या शाळांत येणारे विद्यार्थी प्रामुख्याने गरीब घरांतील असतात. मजूर, वाॅचमन, कामगारांची ही मुले आहेत. आता मनपाच्या काही शाळा उच्चभ्रू व मध्यमवर्गीय वसाहतींत आहेत. तेथे मनपाच्या शाळांना विद्यार्थीच मिळणे दुरापास्त बनल्याचे महापौर तुपे यांनी सांिगतले.
बातम्या आणखी आहेत...