आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे स्पेशल : महत्त्वपूर्ण भूमिका बजावणर्‍या ‘टेलिग्राम’ने पाहिली पाच स्थित्यंतरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माहिती तंत्रज्ञानाची उत्क्रांती होण्यापूर्वी संदेश पाठवण्यासाठी तार अर्थात ‘टेलिग्राम’चा वापर केला जात होता. तार आली म्हटले की काळजात धडकी भरायची. आता मात्र 15 जुलैनंतर ‘टेलिग्राम’ कुणाच्याही काळजात धडकी भरवणार नाही, असा निर्णय दूरसंचार विभागाने नुकताच घेतला आहे. सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘तार’ तंत्रज्ञानाने आतापर्यंत विकासाची एकूण पाच स्थित्यंतरे बघितली आहेत. ‘तार’ अथवा ‘टेलिग्राम’ने गाशा गुंडाळण्याच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने माहिती घेतली. औरंगाबाद शहरात दिवसाला सरासरी पाच तार पाठवल्या जात आहे.

19 व्या शतकामध्ये सॅम्युअल मॉर्स या शास्त्रज्ञाने संदेशवहनासाठी मॉर्स यंत्राचा शोध लावला. त्या वेळी याला मॉर्स सिस्टिम असे संबोधले जात होते. छोटेशे यंत्र ध्वनिलहरीच्या इशार्‍यावर चालत असल्यामुळे कड-कट्ट असा जोरात आवाज येत असे. त्यानंतर न्यूयॉर्कच्या मेकॅनिक्स इन्स्टिट्यूटमध्ये 1944 मध्ये टेलिप्रिंटर यंत्राचा शोध लावण्यात आला. लँडलाइन स्वरूपाच्या या यंत्राने सर्वप्रथम फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क शहरांदरम्यान सेवा देण्यास सुरुवात केली तो काळ होता, 1849 चा.! एका तासाला वीस हजार कॉपी छापण्याची क्षमता असलेले हे यंत्र त्या वेळचा आविष्कार मानला गेला. यंत्र बनवण्यात रॉयल अर्ल्ड, डेव्हिड एडवर्ड हजेस, इमाईल बौडोट, डोनाल्ड मुरे, चाल्र्स क्रुम आदींचा समावेश होता. त्यानंतर या सर्व अभियंत्यांच्या नावाने नवीन तंत्राचा वापर करण्यास प्रत्यक्षात सुरुवात झाली. डोनाल्ड मुरी, बौडोट यांनी अनेक वेळा बदलही केले. या यंत्राद्वारे टेप प्रिंट होऊन तो कागदावर चिकटवून संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचवला जात असे. साधारणत: 1965 पर्यंत ही पद्धत अवलंबली गेली.

तदनंतरच आला आधुनिक काळ
तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची ‘टेलिग्राम’ची स्थित्यंतरे कूस बदलून अत्याधुनिकतेकडे वाटचाल करणारी आहेत. पहिल्या आधुनिक यंत्राला ‘इलेक्ट्रॉनिक्स मशीन’ असे संबोधण्यात आले आहे. फॅक्स मशीनसारखे कागदावरच सुख-दु:खाचे निरोप प्रिंट होऊन येऊ लागले. त्यानंतर एसएफएमएसएस म्हणजेच स्टोअर्ड अँड फॉरवर्ड मेसेजेस सिस्टिमचा वापर सुरू झाला. कनेक्टिव्हिटी असलेल्या शहरात थेट संदेश पाठवून छोटेसे यंत्र ज्या गावात संदेश द्यायचा आहे, त्या गावात घेऊन जाण्याची या तंत्रामध्ये सोय होती.

15 जुलैपर्यंत आहे, डब्ल्यूबीटीएमएस पद्धत
आता वापरातील पद्धतीला डब्ल्यूबीटीएमएस असे म्हटले जाते. वेब बेस्ड टेलिग्राफ मेसेजिंग सिस्टिम ही पद्धत 2007 पासून वापरली जात असल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले आहे. पूर्णपणे संगणक आणि इंटरनेटचा वापर करून तार पाठवण्याची सध्याची पद्धत असून औरंगाबाद शहरात दिवसाला सरासरी एक ते पाच तार पाठवल्या जात आहे.

छायाचित्र - टेलिग्रामचे आधुनिक यंत्र