आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळाईत पाच दुकाने जळून खाक, स्वप्न भंगले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देवळाई चौकात शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पाच दुकानांना आग लागली. यात फूटवेअर, स्वीट मार्ट, आइस्क्रीम पार्लर या दुकानांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्यावर चालतो आणि ज्या दुकानाच्या भरवशावर उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहिली तीच दुकाने खाक झाल्यानंतर पाच जणांचे स्वप्न भंगले. अमजद पठाण हा त्यांच्यापैकीच एक. अनेक ठिकाणी नशीब आजमावल्यानंतर फूटवेअरच्या व्यवसायात त्याचा जम बसला होता. पण दुकान नष्ट झाल्याने आता पुढे काय? असा प्रश्न त्याच्यासमोर आहे.

इयत्ता सहावीत असताना अमजदने शाळा सोडली. पोटाची खळगी भरण्यासाठी तो तेव्हापासून काही ना काही व्यवसाय करतो. याअगोदर त्याने अनेक व्यवसाय केले, पण बॉम्बे फूटवेअरचे दुकान टाकल्यानंतर त्याला चांगले यश प्राप्त झाले होते. तीन वर्षांपासून हे दुकानच त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. पण ते आता नाहीसे झाल्याने त्याला अश्रू अनावर झाले होते.

तो म्हणाला, पहाटे गाढ झोपेत होतो. ३.३० वाजता फोन खणखणला. दोनदा दुर्लक्ष करून तिसऱ्यांदा फोन उचलला अन् दुकाने जळून खाक झाल्याचे कळताच घटनास्थळी पोहोचल्यावर शेजारील मिठाईच्या दुकानाने पेट घेतल्याचे पाहिले. आत गॅस सिलिंडर होते. स्फोट होईल या भीतीने कोणी आत जात नव्हते. पोलिस आणि अग्निशमन दलास वारंवार फोन केले. मात्र, सगळे जळून खाक झाल्यावर ते पोहोचले. व्यवसायात जम बसला म्हणून अमजदने त्यांच्या भावजींना मुंबईहून बोलावले होते. १५ दिवसांपूर्वी दुकानांचा विमा काढण्यासाठी एजंटला कागदपत्रे आणि पैसेही दिले होते. मात्र, ग्रामीण भागात विमा होत नाही म्हणून त्याने पैसे आणि कागदपत्रे परत दिली.

शॉर्टसर्किटमुळे आग : देवळाईचौकातील एकाच रांगेतील पाच दुकानांना शुक्रवारी (ता. ३०) पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. यात किमान २० लाखांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. ममता बिकानेर स्वीट मार्टला प्रथम आग लागली. दरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केले. लगतच्या बॉम्बे फूटवेअर, महालक्ष्मी भेल भंडार, न्यू सुपर ट्रेडर्स, शिवशक्ती आइस्क्रीम पार्लर या दुकानांनी पेट घेतला. आगीचे मोठे लोळ हवेत उडत असल्याचे नागरिकांना दिसले. काहींनी लगेचच अग्निशमन विभागाला माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाचे दोन बंब मुकुंदवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत हनुमान सियाराम बिष्णोई यांचे बिकानेर स्वीट मार्ट, अमजद इसाक पठाण यांचे बॉम्बे फूटवेअर, बेकन अहेमद अबुबकर यांचे न्यू सुपर ट्रेडर्स, सुरेश कुमावत यांचे आइस्क्रीम पार्लर, शंभुसिंग गंगारामसिंग रावत यांचे महालक्ष्मी भेलपुरी सेंटर अशी पाच दुकाने जळून खाक झाली.