आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरूंना पाच हजार रुपये काॅस्ट, हायकोर्टात उत्तर दाखल करण्यास टाळाटाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहायक कुलसचिवपदाच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली नाही. उपरोक्त निवडीत नियमबाह्य आदेश देण्यात आले असल्याचे नमूद करून दाखल याचिकेत उत्तर दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी कुलगुरू आणि कुलसचिवांना पाच हजार रुपये कॉस्ट भरण्याचे आदेश आैरंगाबाद हायकोर्टाचे न्या. संभाजीराव शिंदे न्या. संगीतराव पाटील यांनी दिले आहेत.
विद्यापीठाच्या उप सहायक कुलसचिव पदासाठीच्या २०१२ मधील जाहिरातीमध्ये डॉ. सुनीता जोगराम राठोड यांनी तीन प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. राठोड यांनी खुला, खुला महिला भटक्या विमुक्त जाती आदी प्रवर्गातून अर्ज दाखल केले. दोन्ही पदांच्या मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. दरम्यान, विद्यापीठाने उपकुलसचिवपदाची भरती थांबविली. सहायक कुलसचिवपदाच्या मुलाखतीसाठी वेगवेगळ्या प्रवर्गातून डॉ. राठोड यांना बाेलावण्यात आले. यानंतर निवड यादी लावण्यात आली नाही. नंतर गुलाब दत्तू नागे यांना खुल्या प्रवर्गातून नियुक्ती देण्यात आली. याविरोधात डॉ. राठोड यांनी अॅड. सतीश तळेकरांमार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. उपरोक्त प्रकरणात डिसेंबर २०१५ रोजी नोटीस काढली. १९ जानेवारी २०१६ विद्यापीठाचे वकील हजर झाले. तेव्हा त्यांनी वेळ मागून घेतला. ११ मार्चला पुन्हा एकदा उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला. याचिका शुक्रवारी (१ एप्रिल) सुनावणीस आली असता पुन्हा विद्यापीठाच्या वतीने वेळ मागितला, तेव्हा हायकोर्टाने कुलगुरू कुलसचिवांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रकरणात अॅड. तळेकरांना अॅड. उमाकांत आवटे यांनी साहाय्य केले.