आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच सजग तरुणांमुळे वाचली तरुणीची अब्रू, पदमपुऱ्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाच सजग तरुणांमुळे तरुणीची अब्रू वाचल्याची घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास पदमपुरा भागात घडली. छावणी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. दरम्यान, या तरुणीशी बळजबरी करणाऱ्या दोघांना नागरिकांनी पकडले होते. मात्र, ते दोघेही पसार झाले असून त्यांची दुचाकी (एमएच २० सीसी ०५४८) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
रेल्वेस्टेशन रोडवरील वॉकिंग प्लाझाजवळ राम आणि हनुमानाचे मंदिर आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मंदिरामागील अंधारातून एक तरुणी 'वाचवा... वाचवा' असा धावा करत होती. रस्त्याच्या कडेला उभे असलेले संजयकुमार बारवाल, पराग कुंडलवार, प्रशांत रेणीवाल, राहुल तोंडगिरे, संदीप तोंडगिरे आवाजाच्या दिशेने धावले. हाती चाकू घेतलेले युवक तरुणीवर बळजबरी करण्याच्या तयारीत होते. मात्र, तरुणांना पाहताच तरुणीने त्यांच्याकडे धाव घेतली. स्थानिकांनी त्या दोन युवकांना चोप दिला. गर्दी वाढताच हे युवक दुचाकी तिथेच टाकून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच दामिनी पथक, चार्ली, छावणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे हे घटनास्थळी आले. ही तरुणी नांदेडची असून ती पडेगावातील नातलगांना भेटण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.

सीसीटीव्ही बसवा; नागरिकांची मागणी
पदमपुरा भागात हनुमान, रामाचे पुरातन मंदिर आहे. मंदिरामागे मोकळी जागा असल्याने अनेक टारगट युवक तिथे फिरतात. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वर्गणी जमा केली आहे. पैसे कमी पडत असल्याने हे काम रखडले असून मदतीची अपेक्षा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...