आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लकी ड्रॉचे आमिष दाखवून 200 प्लॉटधारकांची फसवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘दरमहा पाचशे रुपये भरा आणि 24 महिन्यांत प्लॉट मिळवा’अशी सर्वसामान्यांना भुरळ पाडणार्‍या योजनेच्या नावाखाली 200 जणांना गंडवणार्‍या भामट्याला सोमवारी सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. या भामट्याचा अन्य एक साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
1995 मध्ये उमेश आमटे आणि त्याचा साथीदार बी. यू. राजपूत यांनी नक्षत्रवाडी भागात गट क्र. 38 मध्ये 30 बाय 40 चे प्लॉट उपलब्ध असून ‘दरमहा पाचशे रुपये भरा आणि 24 महिन्यांत प्लॉट मिळवा’ अशी जाहिरातबाजी केली. सोडतीनुसार प्लॉट मिळेल, असे सांगत त्यांनी या योजनेसाठी 200 जणांची निवड केली. श्रीकृष्णनगर असे नावही या प्रस्तावित योजनेला देण्यात आले.
या योजनेत साळी समाजाच्या दोनशे बांधवांनी 24 महिने दरमहा पाचशे रुपयेप्रमाणे 12 हजार रुपये प्रत्येकी असे 24 लाख रुपये भरले. दोन वर्षांपूर्वी या लोकांनी आमटेशी संपर्क साधला तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. साळी समाजबांधव या प्रकरणाची तक्रार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकअदालतीत सोमवारी धडकले. त्यांना पोलिसांकडे जाण्याची सूचना करण्यात आली. यानंतर गोपाळ गजानन सोनार, बबन देवाजी सोनार, राधाकृष्ण अहिरे यांनी पोलिस आयुक्त संजयकुमार यांची भेट घेतली. पोलिस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विश्वास पाटील, जमादार दीपक ढोणे, प्रदीप धनवे, विक्रम वाघ आणि महेश उगले यांनी हडकोतून उमेश आमटेला अटक केली. त्याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. निरीक्षक बाबूराव कंजे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या भामट्यांची नक्षत्रवाडी भागात तसूभरसुद्धा जमीन नसल्याचे तपासात आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.