आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुस्थानी ध्रुपद गायकीने रोवले देश-विदेशात पाय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ख्याल गायकी लोकप्रिय असली तरी शुद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणून ओळखल्या जाणार्‍या ध्रुपद गायकीकडे रसिकांचा ओढा वाढू लागला आहे. ध्रुपद गायक संख्येने कमी असले तरी त्यांच्या मैफली देश-विदेशात मोठय़ा संख्येने गाजत आहेत. 20 वर्षांपूर्वीपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या ध्रुपद गायनप्रकाराचे आता पुनरुज्जीवन होत असल्याचे मत ख्यातनाम ध्रुपद गायक अफझल हुसेन यांनी व्यक्त केले.
अफझल हुसेन यांनी ‘दिव्य मराठी’ला मुलाखत दिली. मूळचे मध्य प्रदेशातील दतिया येथील अफझल हुसेन मागील 15 वर्षांपासून औरंगाबादेत स्थायिक झाले आहेत. नाद फाउंडेशनच्या माध्यमातून ते ध्रुपद संगीताचा प्रचार-प्रसार करतात. हा गायन प्रकार आता पुन्हा रसिकप्रिय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ख्याल गायकी लोकप्रिय आहे असे मानले जात असले तरी वास्तव वेगळे आहे. ख्याल गायक मोठय़ा संख्येने आहेत, तर ध्रुपद गायक कमी आहेत. त्यामुळे ध्रुपदपेक्षा ख्याल गायकी लोकप्रिय आहे असे वाटते. वास्तविक, ध्रुपद गायकांच्या मैफली मोठय़ा संख्येने होत आहेत. गुंदेचा बंधू, उदय भवाळकर काय किंवा आधीच्या पिढीतील माझे गुरुवर्य डागर बंधू काय. यांनी तर विदेशातही ध्रुपद गायकी पोहोचवली आणि लोकप्रिय केली. विदेशात केवळ ध्रुपद ऐकणारे, शिकणारे रसिक वाढत आहेत.एमजीएमसोबत असताना आधी माझ्याकडे 20 ते 25 विद्यार्थी येत, पण ध्रुपदला मोठी साधना लागते. ती करायची बहुधा तयारी नसावी. गांभीर्याने ध्रुपद शिकू इच्छिणार्‍यांना शिकवायला मी कधीही तयार असतो. कदाचित आम्हीही कुठे तरी कमी पडत असू, पण ध्रुपद गायकीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आणखी काम केले पाहिजे हे नक्की.
अस्सल हिंदुस्थानी संगीत
अफझल सांगतात, ख्याल नव्हे तर ध्रुपद मूळ शास्त्रीय संगीत आहे. सामवेदात त्याचा उगम आहे. संगीत रत्नाकरपासून सर्व पुरातन ग्रंथांत ध्रुपदचा उल्लेख आढळतो. तानसेन, बैजू बावरा ही मंडळी ध्रुपद गायक होती. ज्याला निखळ शुद्ध संगीत म्हणता येईल अशी ध्रुपद गायकी आहे. ती आध्यात्मिक असली तरी त्यात जीवनातील सर्व रस आहेत, पण आराधनेला अधिक महत्त्व आहे.
संगीतातील फरक
ध्रुपद आणि ख्याल गायकी या संगीत शैलींमध्ये फरक आहे. राग, ताल तेच आहेत. ध्रुपदमध्ये ताना असतात, पण मुरकी, खटके नसतात. ध्रुपदमध्ये रागविस्ताराला अधिक वाव आहे. आलाप, जोड, झाला, कंपोझिशन असा एकाच रागाचा विस्तार करता येतो. ध्रुपदचा कायदा गंभीर, तेवढाच चंचलही आहे, असे हुसेन यांनी उदाहरणासह स्पष्ट करून सांगितले.
सरकारचे दुर्लक्ष
संगीताच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेत नाही. येथे संगीत अकादमी नाही. मध्य प्रदेशात ध्रुपद अकादमी आहे. ध्रुपद गायन जगभर पोहोचवण्यात उस्तादजींनी आयुष्य खर्ची घातले, पण त्यांचा योग्य सन्मान झाला नाही. उस्तादजींना 2011 मध्ये पद्र्मशी जाहीर झाला होता. तो त्यांनी नाकारला. पण त्यांच्यासारख्या ऋषितुल्य संगीत प्रसारकाचा यथोचित सन्मान झाला नाही असे ते म्हणाले.