आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदेचा पूर ओसरला, दिवसभर बचावकार्य, 3 हजारहून लोकांंना सुरक्षित ठिकाणी हलवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्याच्या ६ गावांतील रस्ते बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील १२ गावांतील सुमारे २ हजार ८६३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
गुरूवाती सकाळपासून बचावकार्य..
- वैजापूर तालुक्‍यातील काही वस्‍त्यांमधील लोक गोदावरीच्या पुरात अडकले होते.
- त्‍यापैकी 17 जणांना गुरूवारी वाचवण्यात यश आले आहे.
- एनडीआरएफच्या 25 जवानांची तुकडी ठिकठीकाणी सकाळपासून बचावकार्य करत आहे.
- शिंदे वस्तीतून 17 जणांना पुरातून बाहेर काढण्यात आले.
- वैजापूर तालुक्यातील 12 गावांना आता पाण्याचा वेढा पडला असून त्यांचा संपर्क तुटला आहे.
- वैजापूर-श्रीरामपूर महामार्गही पाण्याखाली गेला आहे.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफची एक तुकडी ३ बोटी घेऊन वांजरगावमध्ये दाखल झाली आहे. गंगापूर तालुक्यात देखील एक हजार लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पुरणगाव, लाखगंगा, बाबतारा, डोणगाव या गावातील सखल भागातील ६२ घरांमध्ये पाणी शिरले होते. तालुक्यातील वांजरगाव येथील गंगागिरी महाराज बेटाचे (सराला) मठाधिपती रामगिरी महाराज व त्यांच्यासोबत ८० जण बेटावरच आहेत. तसेच याच परिसरातील २५० लोकसंख्या असलेल्या शिंदे वस्ती व सय्यद वस्तीला पाण्याचा वेढा पडला आहे. तर सावखेडगंगा शिवारातील ७० नागरिक असलेल्या हिराडेवस्तीलाही पाण्याचा वेढा पडला आहे. दरम्यान, गोदावरी नदीतील विद्युतपंप व पाइप काढताना पाय घसरल्याने तालुक्यातील अव्वलगाव येथील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. प्रशांत मनोहर सवई (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
महंत रामगिरी महाराजांसह ८० भक्त सराला बेटावर अडकले, रस्ते पाण्यात
तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेटाला पाण्याचा विळख्यात सापडले आहे. बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यासह सुमारे ८० जण अद्यापही बेटावरच आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी येण्याबाबत प्रशासनाने विनंती केली, मात्र या सर्वांनी बेट सोडण्यास नकार दिला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील ६ गावांतील रस्ते बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील १२ गावांतील सुमारे २ हजार ८६३ नागरिकांचे इतर सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफची एक तुकडीही ३ बोटी घेऊन वांजरगावमध्ये दाखल झाली आहे.

सोमवारी रात्री नाशिक जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून सुरुवातीला केवळ ११ हजार क्युसेकने गोदावरी नदीत विसर्ग सुरू केला होता. मात्र, पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सायंकाळी ५ वाजेता हा विसर्ग १ लाख १६ हजार इतका झाला होता, तर रात्रीतून पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने बुधवारी पहाटे तो २ लाख ४१ हजार इतका झाला होता. त्यामुळे पाण्याचा प्रवाह नदीपात्र सोडून वाहू लागला. सावखेडगंगा व श्रीरामपूर तालुक्यातील नाऊरला जोडणाऱ्या शिऊर-श्रीरामपूर महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने डोणगाव, बाबतारा, लाख गंगा, बाभूळगावगंगा, भालगाव, नांदूरढोक या गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने त्यांचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी वांजरगाव व सावखेडगंगा या ठिकाणी पाहणी केली. या वेळी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत सताळकर, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, तहसीलदार सुमन मोरे आदी उपस्थित होते.
१२ गावांतील २८६३ नागरिकांचे स्थलांतर
२४ गावांतील विद्युत प्रवाह खंडित...
गोदामाई पातळी सोडून वाहू लागताच गोदाकाठ परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यातच रात्री काही ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने विजेच्या तारा जमिनीवर पडल्या. पाण्याची पातळी वाढत असल्याने महावितरण कंपनीने नागमठाण फिडरवरील वैजापूर तालुक्यातील १०, तर श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण, गोवर्धन, महांकाळ वाडगाव व सराला बेट असे १४, व लाडगाव फिडरवरील १० गावांतील विद्युत पुरवठा खंडित केला आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यावर या भागातील वीजपुरवठा सुरुळीत होणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गोदाकाठच्या नागरिकांना धान्य पुरवठा
गोदावरीला आलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने त्या-त्या गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना गावातील सर्वच नागरिकांना रास्त दरात धान्य वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरात १० पिण्याच्या पाण्याचे टंकरही सुरु केले आहेत. पुरामुळे साथरोग पसरण्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. साथरोग पसरू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला बजावण्यात आल्या आहेत.
अव्वलगावात तरुणाचा मृत्यू
तालुक्यातील अव्व्लगाव येथील प्रशांत मनोहर सवाई (२२) हा दुपारी नदीपात्रातील विद्युत पंप व पाइप काढत असताना त्याचा पाय घसरून तो नदीत पडला होता. पोलिस व स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेऊन त्याला पाण्याच्या बाहेर काढले. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
३०० नागरिक पुरात अडकले
वैजापूर तालुक्यात कोदाकाठी पुरामुळे पुरणगाव, लाखगंगा, बाबतारा, डोणगाव या गावातील सखल भागातील ६२ घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच याच परिसरातील २५० लोकसंख्या असलेल्या शिंदे वस्ती व सय्यद वस्तीला पाण्याचा वेढा पडला आहे, तर सावखेडगंगा शिवारातील ७० नागरिक असलेल्या हिरडेवस्तीलाही पाण्याचा वेढा पडला आहे.
पुढेे वाचा... १२ गावांतील २८६३ नागरिकांचे स्थलांतर... गंगापुरात हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले... पावणेदोन लाख क्युसेक वेगाने पाण्याची आवक... जबाबदार अधिकारी सोबत नसल्याने एनडीआरएफ पथकाची हेळसांड.. पाहा पूरपरिस्‍थिती..
छायाचित्र- प्रशांत त्रिभुवन, वैजापूर
बातम्या आणखी आहेत...