आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूरच्या १७ गावांतील पूरस्थिती निवळली, पुराने रस्ता, विहिरी खचल्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - नाशिक पाटबंधारे विभागाने नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून गुरुवारी पाण्याचा विसर्ग कमी केल्याने गोदावरीला आलेल्या महापुराची परिस्थिती ओसरत चालली आहे. त्यामुळे तालुक्यातील १७ गावांतील पूर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, तालुक्यातील वांजरगाव परिसरातील शिंदे वस्तीत अडकून पडलेल्या ३०० नागरिकांपैकी सुमारे ५७ जणांना गुरुवारी सकाळी एनडीआरएफच्या बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी नियंत्रण रेषेत आल्यावरच हे पथक या ठिकाणाहून हलणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे वैजापूर व श्रीरामपूरला जोडणाऱ्या संपर्क पुलाचा तालुक्यातील सावखेडगंगाच्या बाजूकडील भराव खचला आहे, तर जोडरस्ताही वाहून गेल्याने खडी उघडी पडली आहे. त्यामुळे या मार्गावरील दुचाकी वगळता सर्व मोठ्या वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. या पुरामुळे परिसरातील शेकडो एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात २ लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. मंगळवारी रात्री या विसर्गात वाढ झाल्याने गोदावरीला पूर आला होता. गोदामाई नदीपात्र सोडून वाहू लागली होती. त्यामुळे गोदाकाठच्या तालुक्यातील १७ गावे प्रभावित झाली होती. या पुरामुळे ६ गावांचा संपर्क तुटला होता, तर वांजरगाव परिसरातील गंगागिरी महाराज सराला बेटावर मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यासह ८० जण तसेच शिंदे वस्तीवर सुमारे ३०० नागरिकांना पाण्याचा वेढा पडला होता. या नागरिकांना सुरक्षित स्थळी येण्याबाबत प्रशासनाने मंगळवारी रात्रभर व बुधवारी दिवसभर विनवणी केली होती; मात्र ते वस्ती न सोडण्याच्या निर्णयावर ठाम होते. बुधवारी संध्याकाळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक वांजरगाव येथे दाखल झाले होते. या पथकातील जवानांनी सुमारे ५७ ग्रामस्थांचे गावात सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. या ठिकाणी अद्यापही २०० ग्रामस्थ थांबलेले असून त्यांनी गावात येण्यास नकार दिला आहे.
पुढे वाचा...
> अन् लाडकी लेक पित्याच्या अंत्यसंस्काराला मुकली...
> पुलाचा भराव खचला... वाहतूक बंद
> परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात