आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षम्य दुर्लक्ष: दहा हजार नागरिकांना दीड किलोमिटरचा फेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एमआयटी महाविद्यालय नागसेननगर परिसराला जोडणाऱ्या मार्गावर शिरापुरी नाला आहे. या नाल्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून पाणी वाहत असल्याने नागरिकांची तारांबळ उडते. महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच सातारा गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा पर्यायी रस्ता आहे, पण येथील नाल्यात गाळ साचला आहे तसेच नाल्याचा आकार लहान झाल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. परिणामी, जवळपास दहा हजार नागरिकांना दीड किलोमीटरचा फेरा घेऊन संग्रामनगर उड्डाणपुलामार्गे जावे लागते.
सातारा ग्रामपंचायत असताना पालिकेच्या वतीने या नाल्यावर पुलाचे काम करण्यात आले होते, परंतु वाढत्या नागरी वस्तीमुळे नाल्यावरील पाण्याचा ओघ वाढत गेला. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दोन वर्षांपासून पावसाळ्यामध्ये रस्ता पूर्णपणे बंद होतो, परंतु गेल्या वर्षापासून पावसाळा होऊन गेला तरी नाल्याचे पाणी वरून वाहणे सुरूच आहे. नाल्यात साचलेला गाळ कचरा यामुळे पाणी वरून वाहत आहे. नागरिकांना पायी जाणेही अवघड झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून याच मार्गावर भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाले, परंतु या योजनेमध्ये या नाल्याच्या स्वच्छतेसंदर्भात कोणतीही उपाययोजना नाही. या कामाअंतर्गत नाल्याचेही काम व्हावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
काम व्हावे
- जुलै महिन्यामध्ये कॉलेज सुरू होतात तसेच खासगी शाळा, कार्यालये असल्याने ये -जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पाऊस सुरू होताच पाण्याचा ओघ वाढत असल्याने पावसाळ्याआधी गाळ काढावा.
रमेश बाहुले
विद्यार्थ्यांना त्रास
- उस्मानपुरा, पीर बाजार येथील खासगी शिकवणीला कमी वेळेत जाण्यासाठी विद्यार्थी हाच मार्ग निवडतात, परंतु पाण्यामुळे अनेक विद्यार्थी गाडीवरून नालीमध्ये पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
राहुल शिंदे
नेत्यांकडून दुर्लक्ष
- निवडणूक आली की नेतेमंडळी समस्या सोडवण्याचे आश्वासन देतात, परंतु प्रत्यक्षात काही काम केले जात नाही. येथील नाला वाहत असून ये-जा करण्यासाठी मार्गही शिल्लक नाही. यासंदर्भात अनेकदा मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्या आधी या नाल्याचे काम होणे अत्यंत आवश्यक आहे.
सोमीनाथ शिराणे