आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपूल रस्ते महामंडळाकडेच, मनपाकडे पूल हस्तांतरित केल्याचा दावा खोटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील सर्व उड्डाणपूल वर्षभरापूर्वीच महापालिकेकडे हस्तांतरित केल्याचा दावा रस्ते विकास महामंडळाने उच्च न्यायालयात केला होता. हा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे. सहाही उड्डाणपुलांची मालकी आमच्याकडेच असल्याची स्पष्ट कबुली महामंडळाचे मुख्य अभियंता दिलीप साळुंखे यांनी दिली. मात्र, तब्बल दोन महिने हे पूल मनपाच्याच ताब्यात असल्याचे महामंडळ सातत्याने सांगत असल्याने पुलांवरील संरक्षक जाळ्या, रिफ्लेक्टरचे काम रखडले आहे. याबद्दल ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाठपुराव्यानंतर ही कामे करण्याची तयारी महामंडळाने दाखवली आहे. त्यानंतर म्हणजे मार्चमध्ये पुलांचे हस्तांतरण होणार आहे.

१२ नोव्हेंबर रोजी क्रांती चौकातील उड्डाणपुलावरून दुचाकीवरील औद्योगिक सुरक्षा राखीव दलाचे दोन जवान खाली कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे घडला याबद्दल टीम ‘दिव्य मराठी’ने घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा पुलाला पूर्णपणे संरक्षक जाळी नाही, कठड्यांना रिफ्लेक्टर नाहीत, कठड्यांच्या तळाशी मातीचे ढिगारे साचलेले तसेच पथदिवे बंद असल्याचे आढळले. त्याविषयी सविस्तर वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर युवकांच्या संघटनांनी मातीचे ढिगारे हटवले. मात्र, रिफ्लेक्टर संरक्षण जाळी लावण्याची जबाबदारी मनपा आणि रस्ते विकास महामंडळाने एकमेकांवर ढकलणे सुरू केले. पुलाचे हस्तांतरण मनपाकडे झालेच नसल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांचे म्हणणे होते. वर्षभरापूर्वीच पूल हस्तांतरित झाल्याचे महामंडळाचे उपअभियंता उदय बर्डे सांगत होते. या ढकलाढकलीत काम लांबणीवर पडत अाहे. लोकांचे जीव जात असल्याबद्दल न्यायालयाला चिंता असली तरी प्रशासन ढिम्म असल्याचेही वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले. त्याची अत्यंत गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि सरकारनेच या प्रकरणात हस्तक्षेप करावा. कामाची जबाबदारी मनपा किंवा महामंडळावर निश्चित करावी, असे आदेश १६ डिसेंबर रोजी दिले. मनपाच्या नुकत्याच झालेल्या सभेत उड्डाणपुलांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर केंद्रेकर म्हणाले की, रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. पुलाचे हस्तांतर मनपाला करण्यात आले नसल्याने जाळी बसवण्यासह रिफ्लेक्टर बसवणे, गतिरोधकांची दुरुस्ती आदी कामे महामंडळालाच करावी लागतील.

अटी आणि शर्ती पूर्ण केल्याच नाहीत
नागपूरच्या धर्तीवर शहरातील उड्डाणपुलांखालीही पार्किंगची सोय होऊ शकते, असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत केंद्रेकर यांनी फायलींची तपासणी केली. तेव्हा महामंडळाने अटी, शर्ती पूर्ण केल्या नसल्याने मनपाने पुलांचे हस्तांतरण रोखल्याचे स्पष्ट झाले. पुलाखालील जागा पार्किंगसाठी वापरण्याकरिता पावले उचलू, असे केंद्रेकर म्हणाले.

पुलांचे हस्तांतरण वेगवेगळ्या कारणांनी रखडले आहे. आता आम्ही क्रांती चौकातील पुलाला संरक्षक जाळ्या बसवून देण्याची तयारी दाखवली आहे. इतर पुलांची कामे होऊन अनेक वर्षे उलटली असल्याने तेथे काम करणे अशक्य आहे. - दिलीप सोळुंखे, मुख्य अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ.