आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलासाठी ग्रीन बेल्टचा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सिडको बसस्थानक चौकात उभारल्या जाणार्‍या उड्डाणपुलासाठी ग्रीन बेल्टचा बळी दिला जाणार आहे. याच चौकात असलेला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा ओटा तुटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बंजारा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवाय झाडांसाठी राखीव असलेल्या ग्रीन बेल्टवर रस्ता करण्यासही विरोध व्यक्त होत आहे.
मनपाने 1999 मध्ये शहर एकात्मिक विकास योजनेचा आराखडा तयार केला. त्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यावर रेल्वे स्टेशन, क्रांती चौक, टाऊन हॉल, सेव्हन हिल्स, संग्रामनगर येथे पूल उभारणी झाली. आता महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप), मोंढा नाका, सिडको बसस्थानक चौकात पूल उभारले जाणार आहेत.
दोन पुलांना यापूर्वीच विरोध : मोंढा नाका येथे पूल उभारणीस व्यापार्‍यांनी विरोध दर्शवला, तर महावीर चौकातील पुलाची दिशा बदलणे चुकीचे आहे, असे सामाजिक संघटनांनी रस्ते महामंडळाकडे म्हणणे नोंदवले आहे. त्यापाठोपाठ सिडको चौकातील पूल उभारणीही वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
साइड रस्त्यासाठी : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको चौकातील पुलाचा आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. त्यात वसंतराव नाईक महाविद्यालयासमोरील ग्रीन बेल्टमधून पुलाखालचा साइड रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय पुढे नाईक यांच्या पुतळ्याचा ओटा किंवा पायर्‍या तोडल्या जातील, अशीही शक्यता आहे. त्यामुळे बंजारा समाजातील पदाधिकारी प्रचंड संतापले आहेत. चारच महिन्यांपूर्वी मनपाने 15 लाख रुपये खर्चून पुतळ्याचे सुशोभीकरण केले. त्याच वेळी महामंडळाने पूर्वकल्पना का दिली नाही, असा त्यांचा सवाल आहे. या संदर्भात उग्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. साइड रस्ता दक्षिणऐवजी उत्तर दिशेला म्हणजे लेमन ट्री हॉटेलकडे करावा, असेही त्यांचे म्हणणे आहे.
असा आहे पूल : या पुलाची एक बाजू वसंतराव नाईक महाविद्यालयापासून सुरू होऊन एपीआय कॉर्नरच्या पुढे संपणार आहे. एक किलोमीटर लांबीचा पूल असून त्यावर 24 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अधिकाधिक दोन वर्षांत पूर्ण व्हावा, असे नियोजन आहे.
ग्रीन बेल्ट राखीव भूखंड म्हणून सिडकोनेच मान्यता दिली आहे. त्यावर रस्ता कसा होऊ शकतो. महामंडळाने मध्यम मार्ग काढावा. ग्रीन बेल्ट सुरक्षित ठेवून नाईकांचा पुतळा पुलाच्या मध्यभागी उभारावा. काशीनाथ कोकाटे, नगरसेवक
धक्का लावाल तर..
वसंतराव नाईकांच्या पुतळ्याला किंवा त्याभोवतीच्या ओट्याला धक्का लावाल तर खबरदार, बंजारा समाज त्याविरुद्ध उग्र आंदोलन उभे करेल. महामंडळाने दबाव आणून काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. गोरखनाथ राठोड, अध्यक्ष, बंजारा क्रांती सेना
पुतळा सुरक्षित राहील
वसंतराव नाईक यांचा पुतळा सुरक्षित राहील, याची काळजी घेत आहोत. मात्र, ग्रीन बेल्टची जागा लागणारच आहे. त्यात काही झाडे जातील. त्या मोबदल्यात दहा पट झाडे लावून ती जगवण्याची जबाबदारी महामंडळाने स्वीकारली आहे. एस. एस. जाधव, उपअभियंता, राज्य रस्ते महामंडळ
उड्डाणपुलासाठी ग्रीन बेल्टचा बळी