आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांच्या अनुयायांना पडला ‘जातिअंता’चा विसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्गदर्शन करताना डॉ. जनार्दन वाघमारे. - Divya Marathi
मार्गदर्शन करताना डॉ. जनार्दन वाघमारे.
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्सला विरोध केला नाही तर त्यांच्या वर्ग संघर्षाच्या लढ्यात वर्ण संघर्षाच्या विचारांची बेरीज केली. ‘क्लासलेस सोसायटी’ निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी आंतरजातीय विवाहाचा पर्याय त्यांनी दिला होता. मात्र त्यांच्या अनुयायांनीही या विचारांचे पालन केले नसल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने साजऱ्या करण्यात येत असलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने बाबासाहेबांच्या "अॅनहिलेशन ऑफ कास्ट' या ग्रंथावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी डॉ. वाघमारे म्हणाले, जातीय व्यवस्था धार्मिक ग्रंथातून आली असून ही ग्रंथनिर्मिती स्वार्थातून झाली आहे. हिंदू समाजाची अधोगती ही याच धार्मिक ग्रंथांधारे झाली. त्यामुळेच बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला. लाहोरच्या जात-पात तोडक मंडळाच्या भाषणाचा उल्लेख करून बाबासाहेबांनी १९३५ रोजी हिंदू धर्म सोडणार असल्याचा निर्धार केला होता. मात्र लाहोरच्या लिखित भाषणात त्यांनी १९३६ रोजीचे हिंदू धर्मातील शेवटचे भाषण राहणार असल्याच्या वाक्याने समारोप केला होता. त्यामुळे तत्कालीन आर्य समाजाने कार्यक्रमच रद्द करून टाकला होता. म्हणून बाबासाहेबांनी लिखित भाषणाला ग्रंथ केले. जातीय व्यवस्थेचे समूळ उच्चाटन करून नवसमाज निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले होते. परंतु जातींचे समूळ उच्चाटन करण्याचा क्रांतिकारी विचारांचा त्यांच्या अनुयायांना विसर पडल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करण्यात आले. अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. बी. एस. वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. ह. नी. सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

चर्चारंगली : राज्यशास्त्रविभागाच्या सभागृहात दुपारी तीन नंतर ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ या विषयावरील कार्यशाळेत मुंबई विद्यापीठाचे डॉ. रमेश कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य कला महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश सिरसाठ, एचआरडीसीचे संचालक डॉ. अरुण खरात, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्रोफेसर डॉ. वंदना सोनाळकर, डॉ. उमेश बगाडे, डॉ. श्रीराम निकम आदी मान्यवरांनी मते व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू म्हणाले, ‘मी केलेला रशियाचा प्रवास’ हे अण्णाभाऊ साठेंचे प्रवासवर्णन अत्यंत वाचण्यासारखे आहे. नेहरूंना रशियातील पत्रकारांनी अण्णाभाऊ साठेंविषयी विचारले असता त्यांना काहीच कळाले नाही. त्यामुळे त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना फोनवरून साठेंविषयी विचारले. त्यानंतर मुंबईत नेहरू आल्यावर त्यांनी झोपडपट्टीत जाऊन अण्णाभाऊंची भेट घेतल्याचा उल्लेख कुलगुरूंनी केला. त्याशिवाय अण्णाभाऊ साठे अध्यासनासह सर्व केंद्रांना प्रत्येकी दोन पीएचडीचे विद्यार्थी दिले जातील. त्यांना प्रसंगी विदेशातून संशोधन करण्याचाही खर्च उचलला जाईल. अण्णाभाऊंच्या रशियाभेटीच्या संशोधनासाठी दोन विद्यार्थ्यांना पाठवणार असल्याचा निर्णयही कुलगुरूंनी जाहीर केला.
बातम्या आणखी आहेत...