आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food And Civil Supplies Minister Pankaj Monster, Latest News In Divya Marathi

केंद्रीय मंत्री दानवेंचे पुत्र, जावई यांच्या भवितव्याचा आज फैसला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ बळकट करण्यावर भर दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या पुत्रास उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी नाकारणाऱ्या भाजपने राज्यमंत्री दानवेंसमोर झुकते घेत त्यांच्या पुत्रास भोकरदन विधानसभेची उमेदवारी दिली, तर जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात निवडणूक येण्याची शक्यता नसलेला उमेदवार देऊन जाधव निवडून येण्याच्या दृष्टीने सोय केली. अशा तऱ्हेने दानवे यांनी औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये मर्जीतील व्यक्तींना उमेदवारी मिळवून देऊन आपला वरचष्मा निर्माण करण्याची संधी सोडली नाही. दानवेंचे पुत्र, जावई यांच्या भवितव्याचा आज फैसला होईल.
लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी दानवेंनी अनेकांना विधानसभेचे चॉकलेट दाखवले होते. लोकसभा निवडणुकीत जालना-औरंगाबाद मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपची उमेदवारी मागणारे प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याने दानवेंची चांगलीच अडचण झाली. ऐनवेळी रुसलेल्या माजी मंत्री हरिभाऊ बागडेंना समजावताना दानवेंना मोठी कसरत करावी लागली. वारंवार आपणास वरिष्ठांची दाढी कुरवाळावी लागू नये म्हणून दानवेंनी िमळालेल्या संधीचे सोने करीत मतदारसंघ बांधण्यावर भर दिला. एकेकाळी जनसंघाच्या काळापासून भाजपसाठी मजबूत समजल्या जाणाऱ्या जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांत विधानसभेला उमेदवार देताना भाजप केडरला कुठलाही थारा न देता केवळ आपणास मानणाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात दानवे यशस्वी ठरले.

असे केले मर्जीतील उमेदवार अ‍ॅडजस्ट
1- घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपे यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी आमदार विलास खरात यांना उमेदवारी दिली. टोपे कुटुंबीयांनी भोकरदनमध्ये जास्त लक्ष घातल्याने दानवेंनी बाजी पलटताच टोपेंविरुद्ध दंड थोपटत त्यांच्या परंपरागत विरोधकास भिडवून दिले.
2- जालन्यातून राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांना उमेदवारी दिली. बदनापूर विधानसभेत भोकरदन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. बदनापूरचे शिवसेनेचे संतोष सांबरेंना भोकरदनमधील गावांमध्ये संघटन वाढवण्याची गरज नसल्याचे दानवेंनी सांगितले होते; परंतु आता युती तुटल्याने सांबरे अडचणीत सापडले आहेत.
3- बदनापूरमधून नगरसेवक नारायण कुचे यांना आयात करून भाजपतर्फे उमेदवारी दिली. सिल्लोडमधून दानवे यांनी अनेकांना उमेदवारीचे गाजर दिले असले तरी अखेर उमेदवारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश बनकर यांना दिली.
4- केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलास उमेदवारी मिळाली नसताना व पक्षाचा घराणेशाहीस असलेला विरोध पूर्णत: झुगारून दानवेंनी मुलासाठी भोकरदनमधून उमेदवारी मिळवली.
5- पैठणमधून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या निष्ठावंतास विचारणा केली. त्याने आर्थिक कारण पुढे करताच दानवेंनी शिवसेनेतील सर्वार्थाने सक्षम असलेल्या विनायक हिवाळेंना उमेदवारी दिली.
6- फुलंब्रीमधून इच्छुक असलेल्या औरंगाबाद भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांना अवघड अशा वैजापूरमध्ये गुंतवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेले कन्नडमधील आपले जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते व माळी समाजाचे नेते प्रा. संजय गव्हाणे यांना उमेदवारी देऊन जावई जाधव यांना कुठलाच धोका होणार नाही याचीही काळजी घेतली. भोकरदन विधानसभा मतदारसंघामधील भाजपचे प्रमुख दावेदार रमेश गव्हाड यांनाही हुलकावणी देत उमेदवारी पुत्राला देण्यात यश मिळवले.
दोन उमेदवार मर्जीबाहेरील
परतूर येथून भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांना उमेदवारी मिळाली. येथूनच गायक राजेश सरकटे यांच्यासाठी दानवे आग्रही होते. तर फुलंब्रीतून माजी मंत्री हरिभाऊ बागडेंच्या उमेदवारीने दानवेंचा हिरमोड झाला. बागडेंनी लोकसभेला छळल्याने त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील नारायण कुचे यांना बदनापूरमध्ये हलवले. त्यामुळे बागडेंना मोठा आधारच हिरावून नेल्याची प्रचिती त्यांना येत आहे.