वाळूज - सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील धान्य व टॉनिकच्या ४० बाटल्या लांबवण्याचा मुख्याध्यापिकेने चालवलेला प्रकार वळदगावातील जागरूक ग्रामस्थांनी सोमवारी हाणून पाडला, तर पकडल्या जाण्याच्या भीतीने संबंधित मुख्याध्यापिकेने ऑडिटसाठी जाण्याचे निमित्त करून सहशिक्षिकेला चार्ज देत पळ काढला. मात्र, सहशिक्षिकेने चार्ज न स्वीकारल्यामुळे संबंधित मुख्याध्यापिकेचे पितळ उघडे पडले. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्या लीलाबाई खोतकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
वळदगावात जिल्हा परिषदेची ७ वीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. शाळेत मीना गायकवाड या मुख्याध्यापिका आहेत. शाळा कार्यालयासह एका खोलीमध्ये शालेय पोषण आहारातील तांदूळ, तूरडाळ, हरभरा,वाटाणा व टॉनिकच्या बाटल्या आदी ठेवले जाते. हे धान्य दर दोन महिन्यांनी शाळेला येते. असे असताना सोमवारी शाळाबाह्य मुलाच्या हाताने शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड यांनी अंदाजे ५५ किलो तूरडाळ, ६० किलो हरभरा डाळ, तर १० किलो वाटाणा तसेच ४० टॉनिकच्या बाटल्या असे सर्व साहित्य शाळेलगतच्या रामराव सोलणकर यांच्या घरी नेऊन ठेवले.
पदाधिकाऱ्यांकडून पाहणी : शाळेलगतच्या खासगी घरामध्ये मुख्याध्यापिका गायकवाड यांनी ठेवलेल्या धान्याची पंचायत समिती सदस्य गणेश पाटील नवले, सरपंच सखुबाई चंुगडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष साबळे, नारायणसिंग डांगर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रमेश खोतकर यांनी भेट देऊन पाहणी केली. संबंधित प्रकाराबद्दल मुख्याध्यापिका गायकवाड यांच्याशी संपर्क साधून विचारणाही केली. मात्र, त्यांनी शाळेच्या छतावरील पत्रे बदलण्याचे काम करावयाचे असल्याने धान्य तिकडे हलवल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसे पत्रे बदलण्याचे कुठलेही प्रयोजन नसल्याने पंचायत समिती सदस्य गणेश नवले आणि माजी सरपंच कैलास चुंगडे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी प्रियाराणी पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली.
पदाधिकाऱ्यांची हरकत
धान्याची परस्पर विल्हेवाट लावली जात असताना ही बाब ग्रामपंचायत सदस्या लीला खोतकर यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत मुख्याध्यापिका गायकवाड यांना विचारणा करून या प्रकाराबद्दल हरकत घेतली. तेव्हा त्यावर गायकवाड यांनी धान्य ठेवलेल्या खोलीचे पत्रे बदलण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, या प्रकाराने गोंधळलेल्या गायकवाड यांनी ऑडिटसाठी जाण्याचे निमित्त करून मोहिते नावाच्या सहशिक्षिकेला चार्ज देऊन पळ काढला.
पोलिसात धाव
ग्रामपंचायत सदस्या लीला खोतकर यांनी या प्रकरणी मुख्याध्यापिका गायकवाड यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात धान्य अपहाराबद्दल तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत पोलिस उपनिरीक्षक एस. बी. केदारे, पोलिस जमादार ए. एन. खवले यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. त्याचबरोबर नोंदवह्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्या. त्यानंतर रात्री उशिरा ही तक्रार मागे घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाळवण्यासाठी ठेवले
ज्या घरात हे धान्य ठेवण्यात आले, तेथे नेहमीच असे धान्य ठेवले जाते. कारण या धान्यात मोठ्या प्रमाणावर सोनकिडे झालेले आहेत. या प्रकरणात ग्रामस्थ व पदाधिकारी राजकारण करीत आहेत. तसा कोणताही प्रकार झालेला नाही. मी ऑडिटसाठी पंचायत समितीमध्ये आहे.
मीना गायकवाड, मुख्याध्यापिका
टॉनिकमध्येही सोनकिडे
गायकवाड या धान्याला सोनकिडे लागल्याचे सांगत आहेत. मात्र, या धान्यासोबत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आलेल्या ४० टॉनिकच्या बाटल्याही नेऊन ठेवल्या. मग त्या टॉनिकच्या बाटल्यांनाही किडे लागले काय? हा सर्व प्रकार धान्य लांबवण्याचाच आहे. त्याची चौकशी व्हावी.
गणेश नवले, पंचायत समिती सदस्य.