आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नप्रक्रिया उद्योगावर शनिवारपासून परिषद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यातील शेतकर्‍यांना अन्नप्रक्रियेसंदर्भात माहिती व्हावी या उद्देशाने 22 ते 25 फेब्रुवारीदरम्यान परिषद व प्रदर्शन होणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चरचे अध्यक्ष राम भोगले यांनी बुधवारी एमआयटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चर, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चर (सीएमआयए), मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चर, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आणि आंबा उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी महाविद्यालयात परिषद घेण्यात येत आहे. भोगले म्हणाले, मराठवाड्यात मका, सोयाबीन, भाज्या, आंबा, डाळिंब यांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते. मात्र जिनिंग मिल, डाळ मिल याच्यापुढे फारसे अन्नप्रक्रिया उद्योग मराठवाड्यात नाहीत. त्यामुळे कमी खर्चातही शेतकर्‍यांनी उद्योग कसा सुरू करावा, याचे मार्गदर्शन करण्यात येईल.

मार्केटिंगविषयी मार्गदर्शन : या परिषदेत उत्पादित मालांचे मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या दोन दिवसासाठी शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये आणि उद्योजकांसाठी एक हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे, तर परिषदेत तिसर्‍या दिवशी हॉर्टिकल्चर आणि डेअरी उद्योग या संदर्भात विशेष मार्गदर्शन सत्र होतील. हे सत्र नि:शुल्क ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी एमआयटीमध्ये पत्रकार कक्षाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेला त्र्यंबक पाथ्रीकर, वसंतराव देशमुख, मुनीश शर्मा, प्रशांत देशपांडे, निशिकांत भालेराव आदींची उपस्थिती होती.